Mumbai : चेंबूर बस दुर्घटनेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; अन्य चार विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर (Photo - X)
मुंबई

Mumbai : चेंबूर बस दुर्घटनेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; अन्य चार विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

रस्त्याच्या कडेला असलेले मोठे पिंपळाचे झाड अचानक उन्मळून शाळेच्या बसवर कोसळले. त्यावेळी...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : चेंबूरमध्ये मंगळवारी (दि. ३०) शाळेच्या बसवर मोठे झाड कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत ११ वर्षीय विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात अन्य चार विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांच्यावर झेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

शाळेतून घरी परतताना दुर्घटना

ही घटना दुपारी सुमारे २.५८ वाजण्याच्या सुमारास चेंबूरमधील रोड क्रमांक ११ येथील हेरिटेज प्राईड परिसरात घडली. रस्त्याच्या कडेला असलेले मोठे पिंपळाचे झाड अचानक उन्मळून शाळेच्या बसवर कोसळले. त्यावेळी मेक फोर्स कंपनीची बस युनिव्हर्सल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शाळेतून घरी घेऊन जात होती.

१२ विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका

मुंबई अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, बसमधील १२ विद्यार्थ्यांना बस वाहक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यापैकी चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली, तर विहान श्रीवास्तव हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला.

उपचारादरम्यान विहानचा मृत्यू

जखमी विद्यार्थ्यांना तातडीने झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी असलेल्या ११ वर्षीय विहान श्रीवास्तव याचा उपचारादरम्यान दुपारी ४.२३ वाजता मृत्यू झाला. अन्य चार विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली.

घटनेची चौकशी सुरू

दुर्घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. झाड उन्मळून पडण्यामागील नेमके कारण काय, तसेच परिसरातील धोकादायक झाडांच्या देखभालीबाबत कोणतीही निष्काळजीपणा झाला का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

महापौरांकडून घटनास्थळाची पाहणी

दुर्घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती दिली.

रितू तावडे म्हणाल्या, "मी घटनास्थळी भेट दिली. हे अतिशय मोठे झाड होते. बस त्या रस्त्यावरून जात असताना हे झाड बसवर कोसळले. या घटनेबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली असून, पुढील आवश्यक कारवाई केली जाईल."

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; आतापर्यंत १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांना लाभ

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

VIP दर्शनावरून मंदिरात राडा; आमदाराच्या मुलीने महिला PSI च्या कानशिलात लगावली, प्रत्युत्तरात पोलिसानेही उगारला हात, Video

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड