मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे रहस्य उलगडले

शिंदे यांनी आपल्या बंडाची कहाणी तपशीलवार सभागृहात कथन केली.

प्रतिनिधी

बहुमत चाचणी जिंकल्यानंतरच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडाचे रहस्य उलगडले. आमदार झोपी गेल्यावर रात्रीच्या अंधारात आपल्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी कशा भेटी झाल्या व आपण कशी रणनीती आखली याची माहिती शिंदे यांनी देताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कपाळावर हात मारला. आणखी काही उघड करू नका, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली.

शिंदे यांनी आपल्या बंडाची कहाणी तपशीलवार सभागृहात कथन केली. ते म्हणाले की, ज्या दिवशी निघालो त्याच्या आदल्या दिवशी मी डिस्टर्ब होतो. दुसऱ्या दिवशी विधान परिषद निवडणुकीचे मतदान होते. त्या दिवशी मला जी काही वागणूक मिळाली, त्याचे साक्षीदार आमदार आहेत. मात्र, आमचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्यानंतरच आम्ही बाहेर पडलो. मला काय झाले माहिती नाही. बाळासाहेबांनी नेहमी सांगितले होते, अन्याय होत असेल तर बंड कर. मग माझे फोन सुरू झाले. लोक येऊ लागले. मुख्यमंत्री महोदयांचा देखील मला फोन होता. मी काही लपवू इच्छित नाही. मला विचारले ‘कुठे चालला आहात’. मी म्हणालो, ‘माहिती नाही कुठे चाललो’. ‘कधी येणार’, ‘माहिती नाही’. यावेळी यापैकी एकाही आमदारांनी मला मुख्यमंत्री महोदयांना भेटू, असे म्हटले नाही. हा विश्वास आहे. हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही. सुनील प्रभूंना पण माहित आहे, माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला.

नंतर सगळ्या आमदारांशी संपर्क साधला. त्‍यांना म्‍हणालो चला सोबत. त्‍यांनी एका शब्‍दानेही विचारले नाही, कुठे जायचे. सगळे स्‍वतःच्या मर्जीने सोबत आले. एकटे नितीन देशमुख म्‍हणाले की आईची तब्‍येत बरी नाही. परत जायचे आहे. त्‍यांना विशेष विमान करून मी परत पाठवले. आमचे टॉवर लोकेशन चेक करण्यात आले. गुजरात सीमेवर नाकाबंदी लावण्यात आली; पण इतक्‍या वर्षांच्या अनुभवाने नाकाबंदीला कसे चुकवायचे, मला चांगलेच माहिती होते. त्यानुसार आम्ही सुरतला पोहोचलो. त्यानंतर तेथून आम्ही गुवाहाटीला रवाना झालो.

एक दिवसांचे हे बंड नाही...

अडीच वर्षांत आम्हाला जो अनुभव आला, त्यामुळे हा निर्णय घेतला. अडीच वर्षांत एकदाही सावरकरांबाबत आम्हाला बोलता आले नाही. काँग्रेसने सावरकरांचा अपमान केला. तेव्हाही आम्हाला काँग्रेसचा विरोधात भूमिका घेता आली नाही. कारण आम्ही सत्तेत एकत्र होतो. या गोष्टींमुळे आमदार एकत्र आले. त्यांनी अन्यायाविरोधात बंड केले. एक दिवसांचे हे बंड नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला आश्वासन दिले आहे, महाराष्ट्राला निधी कमी पडू देणार नाही. शिवाय शहा आमच्या पाठिमागे पहाडासारखे उभे आहेत.

‘मी आणि देवेंद्र फडणवीस कधी भेटायचो हे आमच्याही लोकांना माहिती नव्हते. सगळे झोपल्यावर मी फडणवीसांना भेटायला जायचो आणि सगळे उठायच्या अगोदर परत यायचो’, असे एकनाथ शिंदे यांनी सांगताच देवेंद्र फडणवीसांनी डोक्याला हात लावला आणि सगळं उघड करू नका, अशी म्हणण्याची वेळ फडणवीसांवर आली. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या या माहितीमुळे फडणवीस या सगळ्या नाट्यादरम्यान अनेकदा रात्री मुंबईतून बाहेर का पडायचे, याचा उलगडा सगळ्यांना झाला.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत