मुंबई

नागरिकांच्या आरटीओ कार्यालयातील फेऱ्या टळणार

परिवहन विभागामार्फत अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्र, कर तसेच परवानासंबंधित ११५ सेवा देण्यात येतात

प्रतिनिधी

वाहन हस्तांतरण आणि आंतरराष्ट्रीय वाहन परवाने यांसारख्या सेवा आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय राज्य परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतला आहे. यामुळे वाहन मालकाची सर्व माहिती त्या-त्या आरटीओ कार्यालयाला त्वरित उपलब्ध होणार असून नागरिकांना कागदपत्रे सादर करण्यासाठी आरटीओत जावे लागणार नाही, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

परिवहन विभागामार्फत अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्र, कर तसेच परवानासंबंधित ११५ सेवा देण्यात येतात. यापैकी ८४ सेवा या ऑनलाइन केल्या आहेत. करही ऑनलाइनच भरता येतो. ८४ सेवांपैकी नुकत्याच आठ सेवाही आधार कार्डशी जोडण्यात आल्या आहेत. शिकाऊ लायसन्सची (अनुज्ञप्ती) ऑनलाइन परीक्षा, वाहनांची राष्ट्रीय परवाना सुविधा ऑनलाइन करून आधारकार्डशी जोडण्यात आली आहे. त्यापाठोपाठ दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदल, वाहनचालक अनुज्ञप्तीचे दुय्यमीकरण, अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल, अनुज्ञप्तीचे नूतनीकरण या सेवाही आधार कार्डशी जोडल्याने नागरिकांना आरटीओ कार्यालयात खेटे घालण्याची वेळ येत नाही.

परिवहन विभागाने वाहन हस्तांतरण आणि आंतरराष्ट्रीय वाहन परवाना सेवाही आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या वाहनाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात वाहनाचे कायदेशीरपणे आरटीओतून नव्या मालकाच्या नावे हस्तांतरण करायचे झाल्यास स्वतंत्र प्रक्रिया पूर्ण करावी लागते. वाहन कर्जावर घेतले असल्यास त्याचा बोजा उतरविण्याची प्रक्रियाही करावी लागते. त्यातून वाहन नव्या मालकाच्या नावे हस्तांतरित होते. या प्रक्रियेत वाहनांची मूळ कागदपत्रे, अर्जावर जुन्या मालकाची संमती आदी बाबी आवश्यक असतात. विक्रेता आणि खरेदीदाराचे घोषणापत्र, पी.यू.सी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र, कर प्रमाणपत्राची आवश्यकता असते. यासाठी अर्ज आणि शुल्क ऑनलाइन भरण्याची सुविधा परिवहन विभागाने उपलब्ध केली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक