मुंबई : सर्व क्षेत्रातील कामगारांना कायम करा आणि ३० हजार रुपये किमान वेतन द्या, सर्व कामगारांना भविष्य निर्वाह निधी, ईएसआय, पेन्शन लागू करा इत्यादी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावर सिटूच्या वतीने सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू आहे. सोमवारपासून सिटूच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर सुरू झालेल्या आक्रोश ठिय्या आंदोलनात मंगळवारी बांधकाम, घरेलू, बिडी, ऊसतोड, यंत्रमाग इत्यादी असंघटित क्षेत्रातील कामगार हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनाला सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, अर्जुन सेनगुप्ता कमिटीच्या सदस्या व गायिका डॉ. सुमंगला दामोदरन यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी नमूद केले की असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारने विशेष जबाबदारी घेतली पाहिजे व त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद केली पाहिजे.
असंघटित क्षेत्रातील कामगार देशात ९० टक्के असून देशाच्या आर्थिक विकासात ते फार मोठे योगदान करतात. डीवायएफआयचे राज्य अध्यक्ष मोहन जाधव, यांनी आंदोलनाला पाठिंबा देत सरकारच्या बेरोजगारी वाढवणाऱ्या धोरणांवर प्रहार केला. या आंदोलनाचे नेतृत्व सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, सरचिटणीस एम. एच. शेख, सिटू पदाधिकारी के. आर. रघू, विवेक मॉन्टेरो, माकपचे आमदार कॉ. विनोद निकोले, शुभा शमीम, भूषण पाटील, उज्ज्वला पडलवार, भरमा कांबळे, बांधकाम कामगारांचे नेते भरमा कांबळे, शिवाजी मगदूम, बिडी कामगारांच्या नेत्या नसीमा शेख, घरेलू कामगारांच्या नेत्या आरमायटी इराणी, किरण मोघे, ऊसतोड कामगारांचे नेते आबासाहेब चौगुले, यंत्रमाग कामगारांचे नेते युसुफ मेजर आदींनी केले.
शाहिरीतून प्रबोधन
कामगारांचे आपल्या झंझावाती गीतांमधून सातत्याने प्रबोधन करणारे शाहीर संभाजी भगत यांनी कामगारांना संबोधित केले. त्यांनी जाती-धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडून, गरीबांच्या पोरांना भडकवून दंगे करायला लावून सत्ता काबीज करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा आपल्या गीतांमधून पर्दाफाश केला.
कामगार मंत्र्यांना निवेदन
सिटूच्या शिष्टमंडळाला कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी निमंत्रित केले. सिटूच्या शिष्टमंडळाद्वारे महाराष्ट्रातील तमाम असंघटित कामगारांच्या वतीने प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले व या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.