मुंबई

३ हेक्टरपर्यंत भरपाई अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही -मुख्यमंत्र्यांची ग्वाही

नवशक्ती Web Desk

मुंबई : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेती आणि फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, तातडीने पंचनामे करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंत मदत देण्याचा तत्वत: निर्णय घेण्यात आला आहे. महसूल, कृषी विभागाने युद्धपातळीवर काम करून पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात जाऊन मदतकार्यावर देखरेख ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

आधीच दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असताना गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने जे काही थोडेफार पीक हातात येईल, असे वाटत होते, तेही हिरावून नेले आहे. यामुळे बळीराजा उध्वस्त झाला असून, त्यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाने राज्यातील अवकाळी पाऊस आणि गारपीट याबाबत सादरीकरण केले. प्रचलित पद्धतीप्रमाणे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश कालच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले असेल, त्यांना मदत करण्यासाठी निधीचे प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती विभागाकडून मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रस्ताव सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून घेऊन त्यावर एकत्रित निर्णय घेण्याचे निर्देश मंत्रिमंडळाने यावेळी दिले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचनामे करण्याचे काम पूर्ण होताच शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जाईल, अशी ग्वाही दिली. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सर्व पालकमंत्र्यांना देखील सूचना केल्या आहेत. संबंधित विभागातले अधिकारी आणि आपण स्वतः त्या ठिकाणी भेट द्यावी आणि आपल्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशा प्रकारच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. यापूर्वी देखील जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना वेळेत सरकारने मदत केली. या वेळेस दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टर करून मदत केली जाणार आहे. सगळ्या पंचनाम्यांचा एकत्रित आढावा घेतल्यानंतर देखील मदत तत्काळ दिली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

निसर्गाचा मोठा प्रकोप

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड हे तालुके बाधित असून यातील ५३ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई व डहाणू तालुक्यातील ४१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण, नांदगाव, नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, चांदवड, येवला तालुक्यातील ३२ हजार ८३३ हेक्टर क्षेत्रातील कांदा, द्राक्ष, सोयाबीन, मका, गहू, ऊस व फळपिके, धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील ४६ हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. जळगाव, नगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, बुलढाणा आदी जिल्ह्यातील प्राथमिक माहिती आली असून पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त