मुंबई : गेल्या २५ वर्षांतील राजकीय कटुता मागे टाकत काँग्रेसने रविवारी धक्कादायक पाऊल उचलत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीशी (व्हीबीए) ‘हात’मिळवणी केली. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी या नव्या आघाडीत झालेल्या जागावाटपानुसार काँग्रेस १५० जागा लढवणार असून, ‘वंचित’ ६२ प्रभागांत निवडणूक लढवणार आहे. उर्वरित ९ ते १२ जागा महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय समाज पक्षासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत, वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे, मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे, मुंबई महिला आघाडी अध्यक्ष स्नेहल सोहनी, मुंबई युवा आघाडी अध्यक्ष सागर गवई उपस्थित होते.
या आघाडीची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि ‘वंचित आघाडी’चे राज्य उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी संयुक्तपणे केली. विशेष म्हणजे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यावेळी उपस्थित नव्हत्या. उमेदवार निश्चितीसाठी सुरू असलेल्या स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीत त्या व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावतीने पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते. नंतर प्रा. गायकवाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या आघाडीचे स्वागत केले आणि ही युती राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देईल, असे मत व्यक्त केले.
२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये आलेले मोठे अपयश, तसेच २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील पराभवातून धडा घेत काँग्रेसने ‘वंचित’कडे सलोख्याचा हात पुढे केला आहे. या नव्या राजकीय समीकरणामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीत सहभागी होणार नसल्याचे सध्याचे चित्र आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी सध्या शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत बीएमसी निवडणुकीसाठी संभाव्य आघाडीबाबत चर्चा करत असल्याचे सांगितले जाते.
अन्य महापालिकांसाठी स्थानिक पातळीवर निर्णय - सपकाळ
राज्यातील उर्वरित २८ महापालिकांसाठी वंचितसोबत आघाडी करायची की नाही, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असे सपकाळ यांनी सांगितले. दोन्ही पक्षांचे स्थानिक नेतृत्व परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस–वंचित युतीला ‘नैसर्गिक आघाडी’ असे संबोधत सपकाळ म्हणाले की, दोन्ही पक्ष संविधानावर विश्वास ठेवणारे असून समानता, बंधुता आणि सामाजिक न्यायावर आधारित भारत उभारण्यास कटिबद्ध आहेत. १९९८ आणि १९९९ च्या निवडणुकांमध्येही हे दोन पक्ष एकत्र आले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.
या आघाडीद्वारे भाजपला प्रत्युत्तर - पुंडकर
वंचितचे नेते पुंडकर म्हणाले की, भाजपच्या विभाजनकारी राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी ही आघाडी करण्यात आली आहे. वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मान्य केले की, जागावाटपाच्या चर्चा क्वचितच पूर्णपणे समाधानकारक ठरतात, मात्र दोन्ही बाजूंच्या चर्चेनंतर एकमताने निर्णय घेण्यात आला.
दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले की, काँग्रेस आणि वंचित यांची वैचारिक भूमिका समान आहे आणि ते संविधानिक मूल्यांशी निष्ठावान आहेत. संविधानाच्या तत्त्वांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
२०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला केवळ ३१ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी अविभाजित शिवसेनेने ८४ जागा जिंकत आघाडी घेतली होती, तर भाजपने ८२ जागा मिळवल्या होत्या.