संग्रहित छायाचित्र
मुंबई

पालिका-रेल्वेत समन्वयाचा ‘सेतू’ हवा; अतिरिक्‍त पालिका आयुक्‍त अभिजीत बांगर यांची सूचना

मुंबईकर नागरिकांसाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या पूल खात्‍यामार्फत महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्‍प हाती घेण्‍यात आले असून विविध पुलांची उभारणी करताना पालिका, रेल्‍वे, पोलीस, बेस्‍ट यांच्‍यात समन्‍वय व सुसंवाद असावा.

Swapnil S

मुंबई : मुंबईकर नागरिकांसाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या पूल खात्‍यामार्फत महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्‍प हाती घेण्‍यात आले असून विविध पुलांची उभारणी करताना पालिका, रेल्‍वे, पोलीस, बेस्‍ट यांच्‍यात समन्‍वय व सुसंवाद असावा. प्रलंबित बाबी सुसमन्‍वयाने सोडवाव्‍यात. त्‍यासाठी कालमर्यादा निश्चित कराव्‍यात. पुलांचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करण्‍याकामी प्रयत्‍नशील राहावे, असे निर्देश पालिकेचे अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. अंधेरीतील गोपाळकृष्‍ण गोखले पूल, विक्रोळी पूल, कर्नाक पूल या रेल्‍वे रुळांवरील उड्डाणपुलांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून ते वाहतुकीस खुले करावेत, असेदेखील निर्देश बांगर यांनी दिले.

पालिकेच्‍या पूल खात्‍यामार्फत मुंबई महानगरात विविध ठिकाणी पूल उभारणीची कामे सुरू आहेत. यात प्रामुख्‍याने गोपाळकृष्‍ण गोखले पूल, शीव (सायन) पूल, बेलासिस पूल, कर्नाक पूल, विद्याविहार पूल आणि विक्रोळी पूल आदींचा समावेश आहे.

पालिका आयुक्‍त व प्रशासक भूषण गगराणी यांच्‍या मार्गदर्शनाखाली पूल विकासाची विविध कामे प्रगतिपथावर आहेत. या पार्श्‍वभूमीवर अतिरिक्‍त आयुक्‍त अभिजीत बांगर आणि सहपोलीस आयुक्‍त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी सोमवारी पालिका, रेल्‍वे, पोलीस आणि बेस्‍ट अधिकाऱ्यांची महानगरपालिका मुख्यालयात संयुक्‍त बैठक घेतली, त्‍यावेळी त्‍यांनी निर्देश दिले.सहायक आयुक्त (एफ दक्षिण) नितीन शुक्ला, प्रमुख अभियंता (पूल) उत्‍तम श्रोते, प्रमुख अभियंता (रस्‍ते व वाहतूक) गिरीश निकम, जल अभियंता पुरूषोत्‍तम माळवदे यांच्‍यासह रेल्‍वे विभागाचे, बेस्‍टचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बांगर म्‍हणाले की शीव उड्डाणपूल निष्कासनाची कार्यवाही प्रलंबित आहे. नागरिकांची गैरसोय होता कामा नये, याची खबरदारी रेल्‍वे प्रशासनाबरोबरच पालिकेनेदेखील घेतली पाहिजे. प्रलंबित बाबी समन्‍वयाने सोडविल्‍या पाहिजेत. शीव पुलाची उभारणी निश्चित कालावधीत पूर्ण होण्‍यासाठी योग्‍य नियोजन करत विविध कामांसाठी कालमर्यादा आखावी. शीव रेल्‍वे स्‍थानकाच्‍या पूर्व आणि पश्चिम बाजूकडील प्रलंबित कामे मार्गी लावण्‍यासाठी पालिकेच्‍या विविध खात्‍यांनी एकत्रितपणे कार्यवाही करावी. पादचारी पूल उभारणीत अडथळा ठरणारी बांधकामे हटवणे, सांडपाणी वाहक नलिका बंद करणे, सार्वजनिक प्रसाधनगृहाचे निष्कासन, 'बेस्‍ट' वाहिन्‍यांचे स्‍थलांतरण, जाहिरात फलकाचे निष्‍कासन आदी कामे अधिक वेगाने पूर्ण केली पाहिजे, असे निर्देश देत बांगर यांनी या कामांसाठी कालमर्यादादेखील निश्चित केली. ३१ मे २०२६ पर्यंत शीव (सायन) उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत, अशा सूचनादेखील बांगर यांनी केल्या.

बेलासिस पुलाचे काम करण्‍यासाठीचा कंत्राट कालावधी एप्रिल २०२६ पर्यंत आहे. मात्र बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करून डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत वाहतुकीस खुला करण्‍यासाठी प्रयत्‍नशील राहावे, असे निर्देश बांगर यांनी दिले.

गोखले पूल एप्रिल २०२५ पर्यंत

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाचे दुसऱया टप्प्यातील रेल्वे भागातील पुलाचे (रेल्वे ओव्हरब्रीज) काम नुकतेच पूर्ण झाले आहे. पालिकेच्या हद्दीतील पोहोच रस्त्याचे काम एप्रिल महिना अखेरपर्यंत पूर्ण करून ३० एप्रिल २०२५ पासून गोखले पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीस खुला करावा, असे निर्देश बांगर यांनी दिले. कर्नाक रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेली ५५० मेट्रिक टन वजनी उत्तर बाजूची तुळई (गर्डर) रेल्वे भागात सरकविण्‍याची कार्यवाही नुकतीच पूर्ण झाली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी - १० जून २०२५ पर्यंत कर्नाक पूल उभारणी कामातील उर्वरित सर्व काम वेगाने पूर्ण करावीत, असेदेखील बांगर यांनी नमूद केले.

गोपाळकृष्‍ण गोखले पूल, विक्रोळी पूल, कर्नाक पूल या रेल्‍वे रुळांवरील उड्डाणपुलांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून ते वाहतुकीस खुले होणार

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली