मुंबई : टूरिस्ट व्हिसावर मानवी तस्करीप्रकरणी नौदलाच्या सबलेफ्टनंट ब्रम्ह्य ज्योती आणि त्याची सहकारी महिला सिमरन तेजी या दोघांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यात जम्मू-काश्मीर येथून रवीकुमार आणि दीपक डोगरा या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना सोमवारी पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जाणार आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत लेफ्टनंट बिपीन डागरला पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे या गुन्ह्यांत अटक झालेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली आहे.
बोगस कागदपत्रांच्या आधारे व्हिसा तयार करून जम्मू-काश्मीरमधील काही नागरिकांना दक्षिण कोरिया येथे पाठविण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणात काही नौदल अधिकाऱ्यांची नावे समोर आली होती. त्याची नौदलाकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. तसेच मुंबई पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती करण्यात आली होती. मानवी तस्करीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवरुद्ध बोगस दस्तावेज तयार करून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे सोपविण्यातआला होता.
हा तपास हाती येताच कुलाबा येथील नौदलाचा लेफ्टनंट कमांडर बिपीन डागर याला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी १४ पासपोर्ट, रबर स्टॅम्प जप्त केले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या चौकशीनंतर शनिवारी नौदलाचा सबलेफ्टनंट ब्रम्ह्य ज्योती व त्याला मदत करणारी त्याची मैत्रीण सिमरन यांना पोलिसांनी अटक केली. रविवारी दुपारी या दोघांनाही किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात ब्रम्ह्य ज्योतीच्या आदेशावरून बिपीन डागर हा काम करत होता. त्याला सिमरन ही मदत करत होती.