मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरात शुक्रवारी (दि. १४) दुपारी एक संशयास्पद बॅग आढळल्याने मोठी खळबळ उडाली. CSMT रेल्वेस्थानकाबाहेरील बस डेपोजवळ लाल रंगाची बॅग आढळली. बराच वेळ ती बॅग एकाच ठिकाणी असल्याने नागरिकांना संशय आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
नेमके काय घडले?
CSMT बस डेपोमध्ये १३८ क्रमांकाची बस जेथे उभी राहते त्या ठिकाणी दुपारी ४.४५ च्या दरम्यान लाल रंगाची बॅग दिसली. बॅग तिथे दीर्घकाळ ठेवलेली असल्याने प्रवाशांमध्ये संशय आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी पोलिसांना कळविल्यानंतर स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
बॉम्ब शोधनाशक पथक घटनास्थळी
सुरक्षेच्या दृष्टीने परिसर त्वरित रिकामा करून बंदोबस्त वाढवण्यात आला. गर्दी नियंत्रित करण्यासाठी रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी थांबविण्यात आली. पुढील तपासणीसाठी बॉम्ब शोधनाशक पथक घटनास्थळी पोहोचले.
CSMT सारख्या अत्यंत व्यस्त आणि गर्दीच्या ठिकाणी संशयास्पद बॅग आढळणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत संभाव्य धोका टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत. तपासणी अद्याप सुरू आहे.