मुंबई

फेरीवाल्यांची पळता भुई! सीएसएमटी, दादर, बोरिवली परिसर फेरीवालामुक्त; तीन दिवसांत ५३८ बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई

तीन दिवसांत विशेष मोहीम राबवत सीएसएमटी, दादर, बोरिवली, कुलाबा, कुर्ला आदी परिसरातील ५३८ बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आल्याने हे परिसरांनी मोकळा श्वास घेतला. दरम्यान, कारवाईच्या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Swapnil S

मुंबई : फेरीवालामुक्त फुटपाथ यासाठी बेकायदा फेरीवाल्यांची धरपकड सुरू केली आहे. पालिकेच्या २४ वॉर्डात २८ ते ३० जून या तीन दिवसांत विशेष मोहीम राबवत सीएसएमटी, दादर, बोरिवली, कुलाबा, कुर्ला आदी परिसरातील ५३८ बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आल्याने हे परिसरांनी मोकळा श्वास घेतला. दरम्यान, कारवाईच्या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणारे फेरीवाले, पथारीवाले तसेच आरोग्यासाठी अपायकारक अशा पद्धतीने उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात येते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर करावी, असे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.

२८ ते ३० जून दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 'ए' विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते उच्च न्यायालय, चर्चगेट ते उच्च न्यायालय, कुलाबा कॉजवे या परिसरातील ३५; 'बी' विभागातील मोहम्मद अली मार्ग आणि लोकमान्य टिळक मार्ग परिसरातील ३१; एफ (दक्षिण) विभागातील लालबागचा राजा परिसरातील १३; जी (उत्तर) विभागातील दादर रेल्वे स्थानक (पश्चिम) परिसरातील २२०; एच (पश्चिम) विभागातील जोड (लिंक) मार्ग, हिल मार्ग परिसरातील ६८; के (पश्चिम) विभागातील अंधेरी रेल्वे स्थानक (पश्चिम) परिसरातील ६२; आर (दक्षिण) विभागातील मथुरादास मार्ग परिसरातील ३५; आर (मध्य) विभागातील बोरिवली रेल्वे स्थानक (पश्चिम) परिसरातील ४०; एल विभागातील कुर्ला रेल्वे स्थानक (पश्चिम) परिसरातील ३४ अशा एकूण ५३८ फेरीवाल्यांवर पालिकेच्या संबंधित विभाग (वॉर्ड) कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चमूने कारवाई करत सर्व परिसर फेरीवालामुक्त केला.पश्चिम उपनगर परिसरातील कार्यवाही प्रसंगी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे हे प्रत्यक्ष पाहणी करीत होते.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत