मुंबई

Dadar : ''स्वच्छता हवी, गोंधळ नको''; मासळी बाजाराने नागरिक हैराण, मुसळधार पावसात दादरकरांचे आंदोलन

दादर येथील अतिक्रमित मासळी बाजार गेल्या पंचवीस वर्षांपासून रस्त्यावर सुरू असल्यामुळे स्थानिक रहिवासी मोठ्या समस्यांना सामोरे जात आहेत. वाहतूक कोंडी, दुर्गंधी, अपघाताचा धोका, पादचारी मार्गावरील अडथळे आणि आरोग्यविषयक अडचणी यामुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे.

नेहा जाधव - तांबे

दादर येथील अतिक्रमित मासळी बाजार गेल्या पंचवीस वर्षांपासून रस्त्यावर सुरू असल्यामुळे स्थानिक रहिवासी मोठ्या समस्यांना सामोरे जात आहेत. वाहतूक कोंडी, दुर्गंधी, अपघाताचा धोका, पादचारी मार्गावरील अडथळे आणि आरोग्यविषयक अडचणी यामुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. रविवारी (दि. २८) सकाळी जोरदार पावसाला न जुमानता स्वराज्य सीएचएससह परिसरातील रहिवाशांनी मासळी बाजार हटवण्याची मागणी करत आंदोलन छेडले. पोलिसांनी परवानगी नाकारूनही सोसायटीच्या बाहेरच निदर्शने करण्यात आली.

नागरिकांचे म्हणणे आहे की, सेनापती बापट मार्गावरील हा मासळी बाजार कायमस्वरूपी बंद न करता पर्यायी जागी हलवावा, अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होईल. रस्त्यावर बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेल्या मासळी विक्रीमुळे परिसरात नेहमी गोंधळ असतो. थर्माकोल व भुसा रस्त्यावर पडल्याने घाण आणि दुर्गंधी वाढली आहे. मासे स्वच्छ करताना निघणारे पाणी व सांडपाणी रस्त्यावर साचते. डबल पार्किंगमुळे वाहतूक कोंडी वाढते, शालेय विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो.

एल्फिन्स्टन पूल बंद, अडचणी दुप्पट

१२ सप्टेंबरपासून सुरक्षेच्या कारणास्तव ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन रोड पूल (सध्याचा प्रभादेवी) बंद करून तो पाडण्याचे काम सुरू झाले आहे. परिणामी दादर, परळ आणि प्रभादेवी परिसरात मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण झाली आहे. यामध्ये मासळी बाजाराचा गोंधळ भर घालत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

BMC ची भूमिका

सेनापती बापट मार्गावरील मासळी बाजार क्रॉफर्ड मार्केट पुनर्विकास प्रकल्पात कायमस्वरूपी हलवण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, पुनर्विकसित बाजार अद्याप तयार नसल्याने काम रखडले आहे. तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरासाठी बीएमसीने दादरमध्येच एक भूखंड घेतला आहे, त्याची पाहणी मार्केट विभाग व जी-नॉर्थ वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी केली. तरीदेखील बाजार कधी हलवला जाणार याबाबत स्पष्ट निर्णय अद्याप झालेला नाही.

नागरिकांची भूमिका

सामाजिक कार्यकर्ते चेतन कांबळे म्हणाले, एल्फिन्स्टन पूल पाडल्यानंतर वाहतुकीच्या समस्या गंभीर झाल्या आहेत. आपत्कालीन सेवा आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. मासळी बाजार तातडीने हलवला नाही तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल. तर एका स्थानिक रहिवाशांनी प्रतिक्रिया दिली, की बाजार जवळच्या भूखंडावर हलवला तरी ट्रक रस्त्यावरच उभे राहतील. बाजार अशा जागी असावा जिथे वाहतुकीची सोय व्यवस्थित होईल.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके