मुंबई : गोरेगाव-मुलुंड लिंक रोड टप्प्यातील नाहूर पुलाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. नरिमन पॉइंट ते भाईंदरपर्यंतचा प्रवास सुस्साट होणार असून दहिसर-भाईंदर कोस्टल रोड प्रकल्प मे २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मुंबईत मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे, त्याप्रमाणे रस्ते वाहतुकीचे जाळे विकसित करण्यात येत आहे, असे मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले. सन २०२६- २७ च्या अर्थसंकल्पावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपली मते मांडली, त्यावर अश्विनी भिडे बोलत होत्या.
दरम्यान, अर्थसंकल्पावर १८८ नगरसेवकांनी आपली मते मांडली. सदस्यांच्या मतांची दखल घेत काही ठोस उत्तर आयुक्त देतील अशी अपेक्षा होती. मात्र आयुक्तांनी भाषण वाचून दाखवले. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प फसवा अर्थसंकल्प असून त्याचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी सभात्याग केला.
मुंबईतील कोळीवाड्यांबद्दल माहिती देताना २२ कोळीवाड्यांचे सिमांकनाचे नकाशे प्राप्त झाले असून त्यांची हद्द मुंबई उपनगर महसूल खात्याच्या अभिलेखाप्रमाणे प्राप्त झाली आहे. ६४ कोळीवाडयांचे हद्द सिमांकन झाले असून ऊर्वरित महसूल विभागाकडून प्राप्त झाल्यावरच विकास नियोजन आराखड्यात त्याचा समावेश करणार असल्याची माहिती दिली.
कचरा व्यवस्थापनासाठी बाय लॉ बनवले आहेत. वजनाच्या आधारे कचरा वाहून नेण्यासाठी नव्याने निविदी मागविल्या असून आठ झोन मध्ये या संस्था नियुक्त केल्या जातील आणि ऑक्टोबरपासून हे काम सुरू होईल. कचरा वाहनांवर व्हेईकल ट्रँकिंग यंत्रणा आहे. दत्तक वस्ती योजनाही राबवत असून सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाज पत्रावर गेल्या १५ दिवसात १८८ नगरसेवक तब्बल ९४ तास बोलले. नगरसेवक एवढ्या मोठ्या संख्येने बोलण्याची ही पहिलीच वेळआहे.