प्रतिकात्मक छायाचित्र 
मुंबई

Mumbai: दीड वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; २५ वर्षीय आरोपी अटकेत, पीडितेच्या वडिलांकडून न्यायाची मागणी

या प्रकरणी २५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध पॉस्को (POCSO) कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईतील दहिसर परिसरात दीड वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी २५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध पॉस्को (POCSO) कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ९ फेब्रुवारीच्या रात्री ते १० फेब्रुवारीच्या पहाटेदरम्यान घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सकाळी मुलगी हरवल्याची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली.

CCTV फुटेजमधून आरोपीची ओळख

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले असता मुलीला घेऊन जाणारी व्यक्ती ओळखीची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संशयिताला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गंभीर अवस्थेत आढळली चिमुकली

१० फेब्रुवारीच्या सकाळी मुलगी हरवल्याची तक्रार दाखल होताच मुंबई पोलिसांनी तातडीने पाहणी केली. आरोपी हा मजूर असून, तो पीडितेच्या घराजवळील झोपडपट्टीत राहतो. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शोध घेतला असता दुपारी सुमारे ३ वाजता मुलगी गंभीर जखमी अवस्थेत नाल्याजवळ आढळली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला मुंबई सेंट्रल येथील बीएमसी संचलित नायर रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने तिच्यावर तातडीची शस्त्रक्रिया केली असून ती सध्या अतिदक्षता विभागात उपचाराधीन असल्याची माहिती मिळाली आहे.

कुटुंबाकडून न्यायाची मागणी

पीडित मुलीच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "पोलिसांनी मला सीसीटीव्ही फुटेजमध्ये माझ्या मुलीला घेऊन जाणारी व्यक्ती दाखवली. तो आमच्याच ओळखीचा निघाला. आम्हाला फक्त न्याय हवा आहे, बाकी काही नाही," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

प्रशासनाची दखल

या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून मुलीला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, तसेच तपास जलदगतीने पूर्ण करून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, असे निर्देश दिले असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

पुढील तपास सुरू

माहितीनुसार, आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) आणि भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

बालकांविरुद्धचे गुन्हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रुग्णालयच आता होणार अर्जदार! अर्जमंजुरीची प्रक्रिया ८ तासांत; सीएम सहाय्यता निधीची नवीन प्रणाली

रांजणगाव महागणपती मंदिर डागडुजीसाठी तीन महिने बंद

बिहारमध्ये सत्तांतराच्या हालचालींना वेग; नितीश कुमार आज देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

'धुरंधर २' मोडणार 'पुष्पा २'चा विक्रम; चित्रपटाने २५ दिवसांत कमावले १७१२ कोटी; परदेशातील कमाई ४१५ कोटींची

काॅर्पोरेट जिहाद प्रकरणाची TCS कडून चौकशी; नाशिकमधील प्रकार क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया