मुंबई

मुंबईत ‘जीबीएस’बाधित रुग्णाचा मृत्यू; पालिका प्रशासन अलर्ट

मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात गुइलेन-बॅरे सिंड्रोमबाधित ५३ वर्षीय रुग्णाचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात गुइलेन-बॅरे सिंड्रोमबाधित ५३ वर्षीय रुग्णाचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. यासह महाराष्ट्रात जीबीएसमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आठ झाली आहे. मुंबईत या आजाराने दगावलेला हा पहिलाच रूग्ण आहे. अन्य काही रुग्णांवर उपचार सुरू असून गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) उपचारांसाठी मुंबईतील सर्व महानगरपालिका रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये सुसज्ज झाली आहेत.

वडाळा परिसरातील रहिवासी असलेल्या ५३ वर्षीय व्यक्तीला २३ जानेवारी रोजी अशक्तपणामुळे नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो व्ही. एन. देसाई रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून कामाला होता. त्याला श्वसनास त्रास होत असल्याने कृत्रिम जीवनप्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच जीबीएसची बाधा झाल्याचे निदान झाले. त्यानुसार, रूग्णावर योग्य ते उपचार करण्यात आले. उपचार सुरू असतानाच सोमवारी रात्री या व्यक्तीचे निधन झाले. नायर रूग्णालयात दाखल होण्याच्या १६ दिवसांपूर्वी हा रूग्‍ण पुणे येथे जाऊन परतला होता, अशी माहिती समोर आली आहे.

त्याचबरोबर पालघर येथील १६ वर्षीय मुलीला गुइलेन-बॅरे सिंड्रोम बाधेमुळे नायर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मुलीला ताप आला होता, मात्र योग्‍य उपचारांमुळे तिच्‍या प्रकृतीत सुधारणा होत आहे. रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधोपचार, साधनसामग्री आणि तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध असल्याचे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पुण्यात जीबीएसचे पाच नवे रुग्ण

गुईलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) नव्याने पाच रुग्ण सापडले असून, बाधित रुग्णसंख्या १९७ वर पोहोचली आहे. आतापर्यंत १०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, ५० रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातही रुग्ण आढळत आहेत.

जीबीएस उपचारासाठी पालिका सतर्क

गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) उपचारांसाठी मुंबईतील सर्व महानगरपालिका रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये सतर्क आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधोपचार, साधनसामग्री आणि तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध असल्‍याचा दावा महानगरपालिका प्रशासनाने केला आहे. नागरिकांनी जीबीएस आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास घाबरून जाऊ नये. मार्गदर्शन व उपचाराकरिता जवळच्या महानगरपालिका रुग्णालयास त्वरित संपर्क करावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे -

अचानक पायातील किंवा हातात येणारा अशक्तपणा/दुर्बलता/लकवा

अचानकपणे उद्भवलेला चालण्‍यातील त्रास किंवा अशक्तपणा

जास्त दिवसांचा अतिसार (डायरिया) आणि ताप नागरिकांनी अशी घ्यावी काळजी-

पिण्याचे पाणी उकळून प्‍यावे

स्वच्छ व ताजे अन्न खावे

शिजलेले अन्न आणि न शिजलेले कच्चे अन्न एकत्रित ठेऊ नये.

वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा

हात किंवा पायांमध्ये अचानक वाढत जाणारा अशक्तपणा असल्यास त्वरित जवळच्या महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधावा.

सरकार किती मृत्यूंची वाट पाहणार -पटोले

राज्य सरकार जीबीएस या आजाराकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. आता मुंबईत या आजाराने एकाचा मृत्यू झाला. जीबीएस रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या पण त्याचे पुढे काय झाले? सरकारने यासाठी काही विशेष उपाययोजना केल्या आहेत का? केवळ सूचना करून काही होणार नाही, ठोस पावले उचलावी लागतील, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस