मुंबई

राज्यभरात ओला दुष्काळ जाहीर करा! अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

राज्यातील विविध प्रश्नांसंबंधी त्यांच्याशी चर्चा केली. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे

प्रतिनिधी

यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. संपूर्ण खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सध्या राज्यात सुरू असणाऱ्या पावसाने रब्बीचा हंगामसुद्धा धोक्यात आला असल्याने राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आग्रही मागणी करत शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली. त्याचबरोबर राज्यातील इतर प्रश्नांकडे सुद्धा अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. राज्‍यातील विकासकामांवरील स्‍थगिती उठवावी, असेही ते म्‍हणाले.

मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यातील विविध प्रश्नांसंबंधी त्यांच्याशी चर्चा केली. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. खरीपाचे संपूर्ण पीक गेले असून, रब्बी हंगामातील पेरणी केलेल्या पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाने जमिनी वाहून गेल्या असून, घरांचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. तरी राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही, तरी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी केली.

अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Asia Cup 2025 : वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न; जेतेपदासाठी भारताची आज पाकिस्तानशी लढत

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

कचऱ्यासाठी विशेष मोहीम; BMC चा सोमवारपासून उपक्रम; पंधरवड्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट लावणार

शहाड उड्डाणपूल १८ दिवसांसाठी बंद; १५ ऑक्टोबरपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर अनिवार्य

CSMT स्थानकातील प्लॅटफॉर्म १८ राहणार बंद; पुनर्विकासासाठी ८० दिवस फलाट बंद; दोन एक्स्प्रेस दादरपर्यंतच चालणार