लक्षवेधी लढती
दक्षिण-मध्य मुंबई
मंदार पारकर
मुंबईतील दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात यावेळी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे पुन्हा एकदा आपले नशीब आजमावत आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्यांचेच एकेकाळचे साथी आणि मित्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांनी त्यांच्याविरोधात शड्डू ठोकले आहेत. राहुल शेवाळे यांनी दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर अनिल देसाई हे आतापर्यंत शिवसेनेचे विशेषत: उद्धव ठाकरे यांचे ‘पॉलिटिकल मॅनेजमेंट’ पडद्याआडून सांभाळत आले आहेत. नगरसेवक ते खासदार असा प्रवास केलेल्या राहुल शेवाळे यांना राजकारण तसेच निवडणुकांमधील अगदी जमिनीवरचे खाचखळगे माहिती आहेत. तर दुसऱ्या बाजूला अनिल देसाई हे रणनीतीकार आहेत. अनिल देसाई यांच्यासोबत शिवसेनेची अगदी शेवटच्या माणसापर्यंत विणलेली संघटनेची वीण आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे या मतदारसंघात एकेकाळचे मित्र असलेल्या या दोघांमध्ये सामना रंगणार आहे.
दक्षिण-मध्य मुंबई हा मतदारसंघ संमिश्र असा आहे. लोकसंख्येची सर्वाधिक घनताही याच मतदारसंघात आहे. प्रामुख्याने मध्यम तसेच निम्न मध्यमवर्गीय लोकसंख्या या मतदारसंघात राहते. हातावर पोट असलेल्यांची संख्याही या मतदारसंघात लक्षणीय आहे. धारावीसारखी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी याच मतदारसंघात आहे. अणुशक्तीनगर, ट्रॉम्बेसारखा भागही या मतदारसंघात येतो. अनेक धर्म, भाषा, जाती या मतदारसंघात नांदतात. दक्षिण आणि उत्तर भारत असा मिलाफ या मतदारसंघात पाहायला मिळतो. १९५२ साली पहिल्यांदा काँग्रेसतर्फे या मतदारसंघात जयश्री रायजी विजयी झाल्या होत्या. १९५७ साली कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे विजयी झाले होते. १९८४ साली गिरणी कामगारांचे नेते डॉ. दत्ता सामंत यांनी येथून विजय मिळविला होता. १९८९ साली प्रिं. वामनराव महाडिक यांच्या रूपाने हा मतदारसंघ शिवसेनेकडे आला. नंतर २००९ सालचा एकनाथ गायकवाड यांचा अपवाद वगळता हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिला आहे.
२०१४ आणि २०१९ अशा सलग दोन निवडणुकांत शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव करत हा मतदारसंघ शिवसेनेकडे ठेवला. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राहुल शेवाळे यांनी शिंदे गटाची साथ धरली. या मतदारसंघात विधानसभेचे अणुशक्तीनगर आणि चेंबूर हे मुंबई उपनगर जिल्ह्यातले दोन मतदारसंघ आहेत. तर मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहीम हे विधानसभा मतदारसंघ येतात. अणुशक्तीनगरमधून राष्ट्रवादीचे नवाब मलिक हे विजयी झाले होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ते सध्या अजितदादा गटाच्या बाकावर बसतात. चेंबूरमधील आमदार प्रकाश फातर्फेकर हे उद्धव ठाकरे गटात आहेत. धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या आहेत. आधी या मतदारसंघासाठी त्यांच्याच नावाची चर्चा होती. मात्र, त्यांना उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी वर्षा गायकवाड यांनी सुरुवातीला जोरदार आघाडी घेतली होती. देसाईंना सर्वात जास्त लीड मी धारावीतूनच मिळवून देईन, अशी घोषणाही त्यांनी केली होती. मात्र, आता त्या स्वत:च उमेदवार असल्याने या मतदारसंघात त्यांना कितपत प्रचार करता येईल हे पाहावे लागणार आहे. सायन-कोळीवाडा मतदारसंघात भाजपचे आर. तमिळसेल्वन, वडाळ्यातून भाजपचेच ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर तर माहीममधून शिंदे गटाचे सदा सरवणकर आमदार आहेत. त्यामुळे विधानसभा मतदारसंघनिहाय पाहायला गेले तर महायुतीचेच पारडे जड दिसून येते.
या मतदारसंघावर धारावीचे वर्चस्व दिसून येते. तब्बल ६०० एकरांवर ही झोपडपट्टी वसली आहे. सध्या तिच्या पुनर्निर्माणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. धारावीवासीयांनी ५०० चौ.फूट घराची मागणी केली आहे. येथील लघुद्योगांचाही प्रश्न आहे. कुंभारवाडा, टेक्स्टाईल, चामडे आदी अनेक उद्योग या धारावीत आहेत. अणुशक्तीनगर, ट्रॉम्बे, चेंबूर हा भागही या मतदारसंघात येतो. या मतदारसंघात मुस्लिम आणि दलित लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या रूपाने शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हे एकत्र आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिंदे शिवसेना आणि भाजप आहे. दलित-मुस्लिम मतदाराला कोण आपल्या बाजूला खेचतो यावर या मतदारसंघातील विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.
राहुल शेवाळे यांना निवडणुकांचा अनुभव असला तरी दोन वेळा ते खासदार असल्याने अँटी इन्कम्बन्सीचा देखील फटका त्यांना बसू शकतो. त्यामुळे ते हॅट्ट्रिक मारणार की त्यामानाने थेट निवडणुकांच्या राजकारणात नवखे असणारे अनिल देसाई बाजी मारणार हे येत्या ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे.