FPJ
मुंबई

प्रार्थनास्थळावरून धारावीत तणाव, जमाव संतप्त; अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी पाच दिवसांची मुदत विश्वस्तांची विनंती

धारावीतील ९० फूट रस्त्यावरील एका प्रार्थनास्थळाच्या अतिक्रमणावरून एक स्थानिक समुदाय रस्त्यावर उतरून आक्रमक झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हे अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी चार ते पाच दिवसांची मुदत देण्यात यावी, ही सदर प्रार्थनास्थळाच्या विश्वस्तांची विनंती पालिका प्रशासनाने मान्य केल्याने तणाव निवळला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Swapnil S

मुंबई : धारावीतील ९० फूट रस्त्यावरील एका प्रार्थनास्थळाच्या अतिक्रमणावरून एक स्थानिक समुदाय रस्त्यावर उतरून आक्रमक झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हे अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी चार ते पाच दिवसांची मुदत देण्यात यावी, ही सदर प्रार्थनास्थळाच्या विश्वस्तांची विनंती पालिका प्रशासनाने मान्य केल्याने तणाव निवळला असल्याचे सांगण्यात येत आहे.

धारावीतील ९० फूट रस्त्यावरील एका प्रार्थनास्थळाच्या अतिक्रमित बांधकामाबाबत महानगरपालिका प्रशासनाने संबंधितांना नोटीस बजावली होती. या नोटिशीनुसार शनिवारी सकाळी तोडक कारवाई सुरू करण्यात आली असता, स्थानिकांनी रस्त्यावर उतरून सदर कारवाईला विरोध दर्शविला.

त्यानंतर या ठिकाणचे अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने चार ते पाच दिवसांची मुदत द्यावी. या मुदतीच्या कालावधीत स्वतःहून बांधकाम हटवण्यात येईल, अशी लेखी विनंती प्रार्थनास्थळाच्या विश्वस्तांनी महानगरपालिकेचे परिमंडळ २ चे उपायुक्त आणि जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे केली. मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनीही तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सदर तोडक कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली.

मुदतीत बांधकाम हटवण्याचे निर्देश

संबंधितांनी स्वतःहून बांधकाम हटवण्याची लेखी विनंती केल्याने महानगरपालिका प्रशासनाने ही विनंती मान्य केली आहे. ठरलेल्या मुदतीत हे अतिक्रमित बांधकाम काढून टाकावे, असे निर्देशही विश्वस्तांना देण्यात आले आहेत, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न - आदित्य ठाकरे

दरम्यान, राज्य सरकार आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शेवटचा प्रयत्न म्हणून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी