मुंबई

मुंबईसह राज्यभर धुळवडीचा जल्लोष; राजकीय नेते, सेलिब्रिटीही रंगले रंगात

'होळी रे होळी’चा नारा देत, रंगांची मनसोक्त उधळण करत मंगळवारी मुंबईसह राज्यभरात धुळवड जल्लोषात साजरी करण्यात आली. चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच एकत्र येत धुळवडीचा आनंद लुटला. विविध गाण्यांवर डीजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला. कोळीवाड्यात पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात आला.

Swapnil S

मुंबई : 'होळी रे होळी’चा नारा देत, रंगांची मनसोक्त उधळण करत मंगळवारी मुंबईसह राज्यभरात धुळवड जल्लोषात साजरी करण्यात आली. चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच एकत्र येत धुळवडीचा आनंद लुटला. विविध गाण्यांवर डीजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला. कोळीवाड्यात पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात आला. सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांनीही होलिकोत्सव आयोजित करून धुळवड साजरी केली. दरम्यान, होळी खेळताना विविध घटनांमध्ये मुंबईत एकाचा मृत्यू व ३२ जण जखमी झाले आहेत.

मुंबईतील सोसायट्या, चाळी, झोपडपट्ट्या, चौक, गल्लोगली होळी साजरी करण्यात आली. शिवडी, वरळी, वेसावे, सायन आदी कोळीवाड्यांमध्ये, रस्तोरस्ती होळ्या उभारण्यात आल्या होत्या. कोळीवाड्यात गाण्याच्या तालावर तरुण-तरुणींनी ठेका धरला होता. पारंपरिक वेशभूषा परिधान करून कोळीबांधवांनी मनोभावे होलिकामातेची पूजा केली. पारंपरिक कोळी नृत्यांवर महिलांनी ठेका धरला. रासायनिक रंग आणि पाण्याच्या अतिवापर टाळून काहींनी कोरडा रंग खेळून, मिष्टान्नापासून सामिष भोजनावर ताव मारत रंगांची उधळण केली. आपल्या मित्र-मैत्रिणींना रंगवून त्याचे ‘सेल्फी’ काढून ते सोशल मीडियावर अपलोड करण्याची चढाओढ मुंबईकरांमध्ये दिसून आली.

मुंबईत विविध घटनांमध्ये एकाचा मृत्यू, ३२ जण जखमी

मुंबईतील विविध ठिकाणी होळी साजरी करताना एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य ३२ जण जखमी झाले. जखमींपैकी बहुतेकांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जणांनी अतिप्रमाणात भांग घेतल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. वडाळा ट्रक टर्मिनस येथे तुषार सुनिल उंजानवाल (१८) या तरुणावर होळी खेळताना झालेल्या बाचाबाचीत ८-१० जणांनी हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला.

होळी साजरी करण्यास निघालेल्या पती-पत्नीसह ६ जणांचा मृत्यू

हाथरस : यूपीच्या हाथरसमध्ये यमुना एक्स्प्रेस-वेवर मंगळवारी पहाटे एका डबलडेकर बसने चालत्या इको व्हॅनला मागून धडक दिली. या अपघातात पती-पत्नीसह ६ जणांचा मृत्यू झाला, तर ७ जण जखमी झाले. मृतांमध्ये ३ आग्रा येथील आणि ३ राजस्थानमधील धौलपूर येथील रहिवासी होते. ते होळीसाठी घरी जात होते.

बस दिल्लीहून गोरखपूरला, तर व्हॅन दिल्लीहून धौलपूरला जात होती. ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना ही धडक झाली. धडक इतकी भीषण होती की व्हॅन उसळून १० फूट दूर फेकली गेली. तिचा मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर; वाचा सर्व महत्त्वाच्या घोषणा एकाच क्लिकवर

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! पश्चिम रेल्वेकडून मुंबई-अहमदाबाद स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

राज्याचा आर्थिक विकासदर वाढीचा वेग सर्वात कमी; ४ मोठ्या राज्य अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्र मागेच

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी; राज्यावरील थकीत कर्जे GSDPच्या १८.३ टक्के

निर्यातदारांच्या डोक्यावर ‘अधिभारा’चा भार; प. आशियातील संघर्षाचा परिणाम, सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी