मुंबई : दिवाळीत फटाके फोडण्याऐवजी पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याचे आवाहन करण्यासाठी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या सेलिब्रिटी मोहिमेला आता राजकीय वळण लागले आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित, स्वप्नील जोशी आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांच्यासह अभिनेत्री दिया मिर्झा हिनेही मुंबईकरांना फटाके न फोडण्याचे आवाहन केले होते. मात्र, दिया मिर्झाचा व्हिडीओ महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर प्रसिद्ध होताच भाजपने त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर महापालिकेने हा व्हिडीओ हटविल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
दिया मिर्झा हिने स्वतःहून महापालिकेला कोणतेही मानधन न घेता हा व्हिडीओ पाठविला होता. पालिकेच्या विनंतीनंतर तिने हा संदेश रेकॉर्ड करून पाठविल्याची माहिती आहे. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.२५ वाजता महापालिकेच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावर हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. दिवाळी साजरी करताना पर्यावरण आणि आरोग्याची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण सर्वांसाठी हानिकारक आहे. त्यामुळे आवाजाऐवजी आनंदाने दिवाळी साजरी करा, असे आवाहन दिया मिर्झाने केले होते.
साटम यांनी आवाहनाला घेतला आक्षेप
मात्र, मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी सोशल मीडियावर या आवाहनाला आक्षेप घेतला. दिया मिर्झाकडून दिवाळी कशी साजरी करावी, याचे धडे घेण्याची मुंबईकरांना गरज नाही. आपल्या परंपरा आणि संस्कृती खोलवर रुजलेल्या आहेत, अशी भूमिका अमित साटम यांनी मांडली. त्यानंतर महापालिकेने आपल्या सोशल मीडिया खात्यांवरून दिया मिर्झाचा व्हिडीओ हटविला.
दिया मिर्झा हिंदूविरोधी - महापौर
या प्रकरणात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही नाराजी व्यक्त केली. दिया मिर्झा ‘हिंदुत्वविरोधी’ असून तिच्या पूर्वीच्या काही भूमिकांचा उल्लेख महापौरांनी केला. नर्मदा प्रकल्प, समान नागरी कायदा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानाबाबत तिने यापूर्वी विरोधी भूमिका घेतल्याचा दावा रितू तावडे यांनी केला. महापालिकेच्या अधिकृत माध्यमांवरून प्रसिद्ध होणाऱ्या संदेशांची माहिती महापौरांना आधी देण्यात यावी. यापुढे कोणत्याही सेलिब्रिटीची निवड करण्यापूर्वी त्यांची नावे आपल्याला कळवावीत, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली. तसेच आपल्या मान्यतेशिवाय महापालिकेने कोणतेही सार्वजनिक विधान करू नये, असेही त्यांनी म्हटले.
व्हिडिओ हटवण्याची गरज काय - उपमहापौर
दरम्यान, उपमहापौर संजय घाडी यांनी या आक्षेपांपेक्षा वेगळी भूमिका मांडली. फटाके टाळण्याचे आवाहन करण्यात दिया मिर्झाने काहीही चुकीचे सांगितलेले नाही. मग तिचा व्हिडीओ हटविण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
टीका करण्यासारखे काय आहे -दिया मिर्झा
मी केलेला व्हिडिओ प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी होता. त्यामध्ये टीका करण्यासारखे नेमके काय आहे? मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषणाबाबत जनजागृतीसाठी महापालिकेला निर्देश दिले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृतीच्या उद्देशाने मी तो व्हिडिओ केला होता. प्रदूषण कमी व्हावे आणि लोकांचे आरोग्य योग्य राहावे, यासाठी तो व्हिडीओ केला होता, त्यात खटकण्यासारखे काहीच नव्हते, असे प्रत्युत्तर अभिनेत्री दिया मिर्झा हिने दिले.
आदित्य ठाकरेंचा महापौरांना टोला
शिवसेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणावरून महापौर आणि सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. “महापालिकेने एका व्यक्तीला अधिकृतपणे व्हिडीओ करण्याची विनंती केली, त्या व्यक्तीने व्हिडीओ तयार करून पाठविला, त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने तो हटविण्याची मागणी केली, महापौरांनी नाराजी व्यक्त केली आणि अखेर व्हिडीओ हटविण्यात आला,” असा घटनाक्रम त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमधून मांडला. महापौरांच्या वाहनावरील लाल दिवा आणि अधिकृत निवासस्थानावरील खर्चासंबंधीच्या पूर्वीच्या वादांचाही उल्लेख करत त्यांनी महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले.