मुंबई : पार्सल मागविलेल्या आईस्क्रीमच्या पाकिटात सापडलेले ते बोट कंपनीच्या कर्मचाऱ्याचे असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबतचा डीएनए रिपोर्ट मालाड पोलिसांना मिळाला आहे.
मालाड येथे राहणारा ब्रेंडन ऍटिक्स फेरॉव हा तक्रारदार तरुण विलेपार्ले येथील एका खाजगी रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करतो. १२ जूनला त्याची बहिण जेसिकाने जेप्टो या ऑनलाईन ऍपवरुन एक किलो बेसन, तीन युम्मो मॅगो आईस्क्रिमची ऑर्डर केली होती. रात्री जेप्टो कंपनीचा प्रतिनिधी ऑर्डर घेऊन त्यांच्या घरी आला होता. यावेळी त्याने बेसनसोबत दोन मँगो कोन आईस्क्रीम आणि एक युममो बटरस्कॉच कोन आईस्क्रिम आणले होते. जेवण झाल्यानंतर रात्री पाऊणच्या ते सर्वजण आईस्क्रिम खात होते. यावेळी त्याच्या तोंडामध्ये काहीतरी तुकडा आला म्हणून त्याने तो तुकडा तोंडातून हातात घेतला. त्याचे निरीक्षण केले असता त्यात नख असलेला मांसाचा तुकडा असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याने सोशल मीडियावरून युममो आईस्क्रिम कंपनीच्या पेजवर तक्रार केली होती. या तक्रारीनंतर कंपनीच्या कस्टमर केअरमधून त्याला कॉल आला होता. घडलेला प्रकार सांगितल्यानंतर या कर्मचाऱ्याने त्याला आईस्क्रिमवरील कंपनीची छापील माहितीचा फोटो आणि ऑर्डर डिटेल्स पाठविण्यास सांगितले. त्यामुळे ती माहिती त्याला पाठवून दिली होती. दहा मिनिटांनी या कर्मचाऱ्याने त्याला पुन्हा कॉल करुन त्याच्या तक्रारीची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले. नंतर त्याच्याकडून काही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे ते सर्वजण नख असलेला मांसचा तुकडा आईस बॅगमध्ये ठेवून मालाड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आले होते. घडलेला प्रकार सांगून तिथे उपस्थित पोलिसांना सांगून त्याने युममो कंपनीसह संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्याविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तपासात ते आईस्क्रिम पुण्याच्या फॅक्टरीत तयार केले होते. आईस्क्रिम पॅक करताना एका कर्मचाऱ्याच्या हाताला अपघात झाला होता.