संग्रहित छायाचित्र 
मुंबई

पावसात झाडाखाली थांबू नका, BMC चे आवाहन; धोकादायक झाड दिसल्यास लगेच संपर्क साधा!

सोसाट्याच्या वाऱ्यासह झाड पडण्याची अथवा फांदी तुटण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पावसापासून बचाव करताना नागरिकांनी शक्यतो झाडांखाली थांबणे टाळावे

Swapnil S

मुंबई : पावसाळ्यात झाडे कोसळणे, फांद्या कोसळणे या घटना घडत असतात. झाड अंगावर पडल्याने जीवावर बेतू शकते. त्यामुळे पावसात झाडा खाली थांबू नये, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने केले आहे. दरम्यान, आपल्या परिसरात धोकादायक झाड निदर्शनास आल्यास पालिकेच्या १९१६ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन उद्यान विभागाने अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे. दरम्यान, उद्यान विभागामार्फत ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे.

पावसाळ्यातील संभाव्य धोके ओळखता पालिकेच्या उद्यान विभागाद्वारे मुंबईतील प्रामुख्याने धोकादायक झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात आली आहे. वेगाने वारे वाहत असल्यास त्या दरम्यान झाडे किंवा फांद्या कोसळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसात नागरिकांनी झाडांखाली थांबणे टाळावे. सोसाट्याच्या वाऱ्यासह झाड पडण्याची अथवा फांदी तुटण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पावसापासून बचाव करताना नागरिकांनी शक्यतो झाडांखाली थांबणे टाळावे, असे आवाहन उद्यान विभागाने केले आहे. याबाबत उद्यान विभागाने मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये ठिकठिकाणी माहिती पत्रके प्रदर्शित करून जनजागृती केली आहे.

धोकादायक झाडांची छाटणी करा!

इमारती तसेच गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील, परिसरातील, रस्त्यांभोवती धोकादायक वाटणाऱ्या झाडांबाबत मुंबईकरांनी विभाग कार्यालयात (वॉर्ड) उद्यान विभागाशी संपर्क साधावा किंवा १९१६ या नागरी सेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जितेंद्र परदेशी यांनी केले आहे. तसेच मुंबईकरांनी आपल्या इमारती, सोसायटी आवारातील धोकादायक झाडांची रितसर परवानगी घेऊन छाटणी करून घ्यावी आणि संभाव्य धोका टाळावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली