मुंबई : मुंबईत पावसाळ्यात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचते. यामुळे मुंबईकराना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पावसाच्या हाहाकारामुळे काही नागरिकांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर तोडगा म्हणून मुंबई महापालिकेने २०२१ साली पर्जन्यवाहिन्या दुरुस्ती आणि रुंदीकरणाचे प्रकल्प हाती घेतले. यासाठी पालिकेने २०० कोटी रुपये खर्च केले आहेत.
मुंबईतील किंग्ज सर्कल, हिंदमाता, वरळी, गांधी मार्केट, देवनार गौतम नगर, पी. एल. लोखंडे मार्ग, चंदावरकर मार्ग यांसह ५८ ठिकाणांच्या पर्जन्यवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यापैकी अनेक कामे आता पूर्णत्वास आली आहेत, तर जी दक्षिण मुंबईतील गणपतराव कदम मार्गावर वरळी नाका ते सेनापती बापट मार्ग दरम्यान पर्जन्यवाहिनी बदलण्याचे काम २०२२ मध्ये हाती घेण्यात आले.
यापूर्वी वरळी नाका ते श्रीराम मिल दरम्यान ९०० मिमी व्यासाची पर्जन्य वाहिनी अस्तित्वात होती. तर तिथून पुढे सेनापती बापट मार्गापर्यंत १२०० मिमीची पर्जन्यवाहिनी होती. मात्र, आता या दोन्ही वाहिन्या बदलण्यात आल्या असून १८०० मिमी. व्यासाच्या पर्जन्यवाहिन्या या सर्व परिसरात टाकण्यात येत आहेत. सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत खोदकाम तर रात्रीच्या वेळेस बांधकाम करण्यात येते.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी हे काम करण्यात येणार होते. मात्र, यावर्षी महापालिकेकडून पावसाळ्यानंतर काम करण्यासाठी डिसेंबर महिन्यात उशिरा परवानगी मिळाली. आता केवळ २०० मीटरचा पट्टा शिल्लक असून ३१ मे २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत असली तरी त्यापूर्वीच काम पूर्ण होईल. त्यामुळे पुढील पावसाळ्यात जी दक्षिण भागात पाणी साचणार नाही.
- विराज पाटील, कंत्राटदाराचे पर्यवेक्षक