मुंबई : देशातील गोदी कामगारांच्या सहा फेडरेशनची एकजूट, कुशल नेतृत्व, संपासाठी कार्यकर्त्यांनी केलेली पूर्व तयारी आणि भारतातील प्रमुख बंदरातील गोदी कामगारांची एकी यामुळेच बंदर व गोदी कामगारांचा दिल्लीत समझोता वेतन करार झाला, असे स्पष्ट उद्गार ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी माझगाव येथील कामगार सदन सभागृहात झालेल्या कामगार कार्यकर्त्यांच्या विजयी मेळाव्यात काढले.
देशातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांच्या पगारवाढीचा समझोता करार २७ ऑगस्ट २०२४ रोजी दिल्लीमध्ये झाला. गोदी कामगार महासंघांच्या नेत्यांनी दिल्लीत समझोता करार केल्यानंतर द्विपक्षीय वेतन समितीचे सदस्य सर्वश्री सुधाकर अपराज, विद्याधर राणे आणि केरसी पारेख यांचे नुकतेच मुंबई विमानतळावर आगमन झाले. तेव्हा त्यांचे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन आणि ट्रान्सपोर्ट डॉक वर्कर्स युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. कामगार सदन जवळ गोदी कामगारांनी फटाके वाजवून आपला विजयोत्सव साजरा केला.