आशीष सिंह
मुंबई : अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या कंपन्यांशी संबंधित दोन बँक फसवणूक प्रकरणांमध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ५१० कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. यामध्ये दोन चार्टर्ड विमाने, जमिनीचे सहा भूखंड, एक कार्यालयीन जागा, बँक शिल्लक, मुदत ठेवी (एफडी), गुंतवणूक आणि येण्याबाकी रकमांचा समावेश आहे. कथित बँक फसवणुकीशी आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (आरसीओएम) मधील २४७.१२ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीशी ही नवीन जप्ती संबंधित असल्याची माहिती ईडीने मंगळवारी दिली.
आतापर्यंत २३ हजार कोटींची मालमत्ता जप्त
आरकॉम प्रकरणाअंतर्गत जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये दोन चार्टर्ड विमाने, जमिनीचे सहा भूखंड आणि महाराष्ट्रातील एका कार्यालयीन जागेचा समावेश आहे तर आरसीएफएल/आरएचएफएल प्रकरणाशी संबंधित तमिळनाडूतील दोन पवनचक्की, बँक शिल्लक, मुदत ठेवी आणि गुंतवणूक/येणी जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, ईडीने ‘पीएमएलए’ आणि ‘फेमा’ अंतर्गत रिलायन्स अनिल अंबानी समूहाविरुद्धच्या विविध प्रकरणांमध्ये आतापर्यंत सुमारे २३ हजार १०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.