मुंबई : सोन्याचा चमचा तोंडात घेऊन राजकारणात आल्याची सातत्याने टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. मात्र, आता शिंदेंनीच मुंबई महापालिका निवडणुकीत घराणेशाहीला प्राधान्य दिल्याचे नामनिर्देशन अर्जांवरून दिसून येत आहे. त्यामुळे घराणेशाहीवर बोलणाऱ्या शिंदेंनी तीच परंपरा पुढे नेत असल्याची भावना सामान्य कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांनी अपक्ष अर्ज दाखल करत, पक्षाची डोकेदूखी वाढवली आहे. अशातच मुंबईत शिंदे यांच्या शिवसेनेत घराणेशाहीची पाठराखण करत उमेदवारी दिल्याचे समोर आले आहे.
असे आहेत उमेदवार
प्रभाग क्रमांक १६९ मधून आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा जय कुडाळकर यांना उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दादर-प्रभादेवीत माजी आमदार सदा सरवणकर यांची कन्या प्रिया गुरव, मुलगा समाधान सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. चांदिवलीमधून आमदार दिलीप लांडे यांची पत्नी शैला लांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर चेंबूरमधून आमदार तुकाराम कांते यांची सून तन्वी काते यांना, जोगेश्वरी पूर्वमधून खासदार रवींद्र वायकर यांच्या कन्या दीप्ती वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भांडुप प्रभाग क्रमांक ११३ मधून आमदार अशोक पाटील यांचा मुलगा रूपेश पाटील, अणुशक्तीनगर आमदार तुकाराम काते यांच्या सूनबाई समृद्धी काते, धारावीतून शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांची भावजय वैशाली शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.