मुंबई

एकनाथ शिंदे आमचे गॉडफादर,आता कोणता झेंडा हाती घ्यायचा?

प्रतिनिधी

शिवसेनेचे ठाणे, नवी मुंबई शहरातील ताकदवान नेतृत्व समजल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीमुळे सध्या ठाणे शहरासोबत नवी मुंबईतील बहुतांश शिवसेनेच्या नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आगामी निवडणुकांची व्यूहरचना आखण्याची जबाबदारी स्वतः शिंदे यांच्याकडे असताना त्यांनी स्वतःच बंड केल्याने नवी मुंबईतील अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक द्विधा मनःस्थितीत सापडले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमचे पक्षप्रमुख आणि आदर्श तर एकनाथ शिंदे आमचे गॉडफादर; मात्र आता कोणता झेंडा हाती घ्यायचा, हा प्रश्न उभा राहिल्याने अनेकांनी नवी मुंबईतील भाजप आमदार गणेश नाईक यांच्याशी छुपा संपर्क साधण्याच्या प्रयत्न सुरू केला आहे.

शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘न भूतो न भविष्यती’ असा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी घडला. दिग्गज नेते, नगरविकासमंत्री आणि ठाकरे कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांपैकी एक असणारे एकनाथ शिंदे यांनीच बंड पुकारल्याने राज्यातील महाविकास आघाडीची घडी काहीशी विस्कटली आहे. शिंदे यांच्या बंडानंतर कट्टर शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक होत आमदारांच्या कार्यालयांवर घोषणाबाजी करीत निषेध मोर्चे काढले. तर अनेक ठिकाणी त्यांच्या फलकांना काळे फासत कार्यालयांची तोडफोडदेखील केली आहे. तर दुसऱ्या बाजूला आगामी निवडणुकांच्या दृष्टीने काही शिवसेनेच्या प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांनी आपली प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी या आंदोलनात सहभागी न होण्याला पसंती दिली असल्याचे चित्र नवी मुंबईत दिसत आहे.

दरम्यान, नवी मुंबई महापालिकेची प्रभागरचना फेब्रुवारीमध्ये झाल्याने प्रभागरचनेत कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने या वादात न पडता भाजपमधील आपले स्थान पक्के करण्यासाठी काही पदाधिकारी-नेत्यांनी नाईकांच्या दरबारी फेऱ्या मारण्यास सुरुवात केली आहे. तर कायम पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना शिंदे यांच्या बंडखोरीमुळे धक्का बसल्याने खुद्द प्रमुख नेत्यांनीच उचललेल्या पावलांमुळे शिवसेनेत यापुढे आपले कसे होणार? या भीतीने भाजप नगरसेवक आणि इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम