चारुल शाह-जोशी/मुंबई
एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, कवी वरवरा राव, वर्नन गोन्साल्विस आणि अरुण परेरा यांचा जामीन रद्द करण्याची राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) मागणी विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
मुंबई प्रेस क्लबच्या गच्चीवर १९ जानेवारी रोजी आयोजित एका कार्यक्रमात हे चौघेही उपस्थित होते आणि त्यांनी त्यात सक्रिय सहभाग घेतला होता, असा दावा एनआयएचे विशेष सरकारी वकील प्रकाश शेट्टी यांनी केला होता. जामीन मंजूर करताना या आरोपींनी सह-आरोपींशी किंवा या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधू नये, अशी कडक अट न्यायालयाने घातली होती. या अटीचा भंग झाल्याचा दावा करत एनआयएने चौघांचा जामीन रद्दची मागणी केली.
आरोपींना निमंत्रण टाळायला हवे होते
न्यायालयाने एनआयएची ही याचिका फेटाळून लावली असली, तरी आरोपींना सतर्कतेचा इशारा दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, 'जामिनातील अटींची पूर्ण कल्पना असताना, मुंबई प्रेस क्लबच्या कार्यक्रमात इतर सहआरोपी एकत्र आल्याचे पाहून पुढील अडचणी टाळण्यासाठी आरोपींनी तिथून काढता पाय घ्यायला हवा होता. जामीन रद्द होण्यासारख्या अर्जाना निमंत्रण देणे त्यांनी टाळायला हवे होते. जामिनाच्या कोणत्याही अटीचा भंग होणार नाही, याची योग्य ती काळजी आरोपींनी घेणे अपेक्षित आहे. मात्र, विशिष्ट जामीन अट घालण्यामागचा हेतू लक्षात घेणे आवश्यक आहे, असे न्यायालय म्हणाले.