मुंबई

ईव्हीएममध्ये घोळ प्रकरण इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनच्या शास्त्रज्ञांची हायकोर्टात हजेरी ; प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका मांडण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण आणि हे प्रकरण पूर्णतः वेगळे असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले

नवशक्ती Web Desk

मुंबई : २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील कथित ईव्हीएम घोळप्रकरणी हैदराबाद येथील इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (ईसीआयएल) अधिकारी आणि शास्त्रज्ञांनी मंगळवारी उच्च न्यायालयात हजेरी लावली. ईव्हीएमशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करू नये, अशी विनंती न्यायालयाला केली. याची दखल घेत न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करा, असे निर्देश देत याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातील मतदान केंद्रांवरील ईव्हीएममध्ये त्रुटी होत्या. मतदान झाल्यानंतर जाहीर केलेले एकूण मतदान आणि मतमोजणीनंतर अर्ज २० अन्वये जाहीर केलेल्या उमेदवारनिहाय मतदानाची आकडेवारी यात विसंगती असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते कीर्तिकुमार शिवसरण यांनी अ‍ॅड. संदीप रणखांबे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी ईसीआयएलच्या अधिकारी आणि शास्त्रज्ञांना हजेरी लावली. न्यायालयाने मागील सुनावणीवेळी अधिकारी व शास्त्रज्ञांना या प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले होते. त्यानुसार दोन अधिकारी-शास्त्रज्ञ न्यायालयात हजर होते. सर्वोच्च न्यायालयात कथित ईव्हीएम त्रुटीसंबंधी प्रकरण प्रलंबित आहे याकडे न्यायालयाचे लक्ष वेधताना उच्च न्यायालयाने सुनावणी घेऊ नये अशी भूमीका मांडली. याला याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण आणि हे प्रकरण पूर्णतः वेगळे असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने ईसीआयएलच्या अधिकारी आणि शास्त्रज्ञांना प्रतिज्ञापत्राद्वारे लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश देऊन याचिकेवरील सुनावणी तहकूब केली.

ऊसदराचे आंदोलन चिघळणार? कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ऊस फेकण्याचा प्रयत्न

मुंबई आशियातील सर्वात 'आनंदी' शहर; बीजिंग आणि शांघायला मागे टाकत मारली बाजी

स्वदेशी 'इक्षक' जहाज आज नौदलाच्या ताफ्यात सामील होणार

मृत्यूपत्राच्या माध्यमातून भाडेकरार करू शकत नाही! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाचे नेतृत्व लवकरच IPS अधिकाऱ्याकडे; गृह खात्याचा हिरवा कंदील