सर्वाधिक गर्दीचा सार्वजनिक परिसर म्हणजेच रेल्वेतील गर्दी, स्थानकावरील प्रवाशांचा मुखपट्टीविना प्रवास यामुळे चिंता निर्माण झाली आहे. अशातच आम्ही दोन वर्षे मास्क आणि निर्बंधांनी कोंडले गेलो होतो; मात्र आता कितीही लाटा आल्या तरी आम्ही मास्क लावणार नसल्याची भूमिका रेल्वे प्रवाशांनी स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने राज्यात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा मास्कसक्ती लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आता पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना मास्कसक्तीसंदर्भात पत्रदेखील पाठवले आहे; मात्र राज्यात संभाव्य चौथ्या कोरोना लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना दुसऱ्या बाजूला उपनगरीय रेल्वेमार्गांवरील प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क अनिवार्य असल्याचे राज्य सरकार आणि महापालिकेने वेळोवेळी सांगितले आहे. राज्यात मागील तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होताना दिसून येत आहे. ही वाढ पाहता शासनाने नागरिकांना मोकळ्या जागा वगळता सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक असल्याचे एका पत्रात नमूद केले आहे. पत्रामध्ये सांगण्यात आले आहे की, रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, कार्यालये, रुग्णालये, महाविद्यालये, शाळा यासारख्या सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे अनिवार्य आहे; परंतु नागरिकांकडून या चौथ्या लाटेला गांभीर्याने घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे.