मुंबई

शिंदे सेनेतून राजेश शहा यांची हकालपट्टी

Swapnil S

मुंबई : वरळी ‘हिट अँड रन’ प्रकरणातील आरोपी मिहीर शहाचे वडील राजेश शहांची शिवसेना शिंदे गटाने बुधवारी उपनेतेपदावरुन हकालपट्टी केली. घटनेनंतर तीन दिवसांनी ही कारवाई करण्यात आली.

शिवसेना शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाने राजेश शहांच्या हकालपट्टीचा आदेश काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशावरुन राजेश शहांना शिवसेना उपनेतेपदावरुन कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. राजेश शहांना या प्रकरणात अटक झाली होती, पण दुसऱ्याच दिवशी त्यांना न्यायालयाने जामीन दिला.

रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास वरळीतील ऍट्रिया मॉलजवळ मिहीर शहाच्या बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवर नाखवा दाम्पत्य प्रवास करत होते. ते ससून डॉकवरुन घरी परतत होते. कारची धडक बसताच नाखवा दाम्पत्य बोनेटवर पडले. प्रदीप नाखवांनी प्रसंगावधान राखत बाजूला उडी घेतली. त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचला. त्यांनी कारसोबत धाव घेत चालकाकडे गयावया केली, कार थांबवण्यासाठी आर्जवे केली. पण मिहीर शहाने कार दामटवली. त्यामुळे प्रदीप यांच्या पत्नी कावेरी गंभीर जखमी झाल्या व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

मिहीरला ६ दिवसांची पोलीस कोठडी

‘हिट अँड रन’ प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर याला कोर्टासमोर बुधवारी हजर करण्यात आले असता पोलिसांनी अधिक तपासासाठी त्याची कस्टडी मागून घेतली. मिहीरने कोर्टात कबुली दिली की, अपघाताच्या दिवशी आपणच कार चालवत होतो. कोर्टाने मिहीर याला सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मिहीरने अपघात झाल्यानंतर मुंबईतून पळ काढला होता. वडील राजेश शहा यांच्यासह आणखी बारा जणांनी मिहीरला लपवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

नाखवा कुटुंबाला १० लाख रुपयांची अर्थिक मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित नाखवा कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा बुधवारी केली.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला