मुंबई

मुंबई पालिकेवर मुख्यमंत्र्यांचा एक हाती कंट्रोल? अप्पर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल पालिकेत!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा असताना मुंबई महापालिकेतील एकनाथ शिंदे यांचे वजन कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी खेळी खेळली आहे.

गिरीश चित्रे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा असताना मुंबई महापालिकेतील एकनाथ शिंदे यांचे वजन कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी खेळी खेळली आहे. राज्याचे अप्पर मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंह चहल यांनी थेट सोमवारी पालिका मुख्यालयात विविध प्राधिकरणाच्या कामाचा आढावा घेतला.

एकूणच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी मुंबई महापालिकेचा कंट्रोल आपल्या हाती घेण्यासाठी रणनीती आखल्याची चर्चा आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सिमेंट काँक्रिटच्या रस्ते कामाची झाडाझडती घेण्यासाठी पाहणी दौरा केला. तर त्याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे राज्याचे अपर मुख्य सचिव (गृह) व मुंबई शहर जिल्ह्याचे पालक सचिव इक्बाल सिंह चहल यांनी पालिका मुख्यालयात आयुक्तांच्या कार्यालयाजवळील सभागृहात विविध प्राधिकरणाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.

दरम्यान, प्रोटोकॉलनुसार पालिका आयुक्तांनी बैठक आयोजित केल्यावर संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पालिका मुख्यालयात येणे बंधनकारक आहे. मात्र चहल यांना मंत्रालयात बैठक घेण्याचे अधिकार असून पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह विविध प्राधिकरणाच्या आयुक्त व अधिकाऱ्यांना मंत्रालयात पाचारण केले असते. मात्र विविध प्राधिकरणाच्या बैठकीच्या नावाखाली एकनाथ शिंदे यांचा मुंबई महापालिका प्रशासनावरील कंट्रोल कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ही खेळी खेळल्याचे बोलले जाते.

शिंदेंचा दबदबा कमी करण्यासाठी खेळी?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभागाची जबाबदारी आहे. मात्र नगरविकास विभाग, शिंदे यांच्या अखत्यारीत असलेल्या विभागातील कामाची झाडाझडती, अशी छुपी खेळी फडणवीस यांनी खेळल्याचे बोलले जाते.

शिंदे यांचे मुंबई महापालिकेतील वर्चस्व लक्षात घेता फडणवीस यांनी मुंबई महापालिकेकडे मोर्चा वळवला असून फक्त एकनाथ शिंदे यांचा पालिकेतील दबदबा कमी करण्यासाठी ही खेळी फडणवीस यांनी खेळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video