मुंबई

गणरायांना आज निरोप! विसर्जन सोहळ्यासाठी पालिका सज्ज

घरोघरी आगमन झालेल्या तसेच सार्वजनिक मंडळांच्या श्री गणेशाच्या मूर्तीचे मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होणार असून त्यासाठी मुंबई महापालिका तसेच पोलीस यंत्रणेसह स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.

Swapnil S

मुंबई : यंदा ७ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन झाल्यानंतर संपूर्ण देशभर भक्तिमय वातावरण असतानाच, आता लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. घरोघरी आगमन झालेल्या तसेच सार्वजनिक मंडळांच्या श्री गणेशाच्या मूर्तीचे मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होणार असून त्यासाठी मुंबई महापालिका तसेच पोलीस यंत्रणेसह स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. मुंबई पोलिसांचा प्रचंड फौजफाटा बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरला असून वाहतुकीचे चोख नियोजन करण्यात आले आहे. गणरायाच्या आगमनाप्रमाणेच विसर्जन सोहळा या गणेशभक्तांसाठी पर्वणी असते. लालबागचा राजा, मुंबईचा राजा (गणेशगल्ली), चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकायाचा राजा, खेतवाडीतील मानाचे गणपती, तसेच मुंबईतील सर्व प्रसिद्ध मंडळांच्या गणपतींना निरोप देण्यासाठी मुंबईसह बाहेरून गणेशभक्त मुंबईत दाखल होत असतात. त्यामुळेच १२ दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जनासाठी - मुंबई आणि उपनगरात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात यंदा गणेशमूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह २०४ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे सुमारे १२ हजार अधिकारी तथा कर्मचारी या ठिकाणी तैनात केले आहेत. विसर्जनाच्या ठिकाणांवर ७१ नियंत्रण कक्ष स्थापन केले असून विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मुंबईत गिरगांव चौपाटी, शिवाजी पार्क, जुहू, वर्सोवा, मढ,पवई आदी प्रमुख विसर्जनस्थळे आहेत. मूर्ती विसर्जनासाठी - येणारी वाहने चौपाटीवरील वाळूमध्ये अडकू नयेत, म्हणून - तेथे ४७८ स्टील प्लेट टाकण्यात आल्या आहेत. विविध - ठिकाणी ४३ जर्मन तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. चौपाट्यांवर ७६१ जीवरक्षकांसह ४८ मोटरबोटी तैनात केल्या आहेत, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले. निर्माल्य जमा करण्यासाठी १६३ कलशांसह २७४ वाहनांची सोय करण्यात आली आहे.

विसर्जन सोहळ्यादरम्यान पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १९२ नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ६६ निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. विविध ठिकाणी ७२ स्वागत कक्ष तयार करण्यात आले आहेत.

आरोग्य विभागाकडून ७५ प्रथमोपचार केंद्रांसह ६७ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रकाश योजनेसाठी 'बेस्ट' च्या सहकार्याने १,०९७ फ्लडलाइट - आणि २७ सर्चलाइट लावले आहेत. १२७ फिरती प्रसाधनगृहे - ठेवण्यात आली आहेत. आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या - सुसज्ज वाहनांसह प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.

भरती, ओहोटीच्या वेळा

मंगळवारी समुद्रात सकाळी ११.१४ वाजता ४.५४ मीटरची भरती, सायंकाळी ५.२२ वाजता ०.८६ मीटरची ओहोटी, रात्री ११.३४ वाजता ४.३९ मीटर उंचीची भरती असेल. बुधवारी पहाटे ५.२७ वाजता ०.४८ मीटरची ओहोटी, सकाळी ११.३७ वाजता ४.७१ मीटरची भरती, सायंकाळी ५.४९ वाजता असेल. भरती तसेच ओहोटीदरम्यान विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मिरवणुकीवर ड्रोनची नजर

मुंबईत विसर्जन सोहळ्यासाठी आठ अतिरिक्त पोलीस आयुक्त, ४० पोलीस उपायुक्त, ५० सहाय्यक पोलीस आयुक्त, २९०० पोलीस अधिकारी, २४ हजार ५०० पोलीस कर्मचारी, एसआरपीएफच्या प्लाटून, शीघ्र कृती दलाची तुकडी, दंगल नियंत्रण पथक, गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय अफवा पसरू नयेत म्हणून समाज माध्यमांवर नजर ठेवली जाणार आहे, तसेच मिरवणुकीवर ड्रोनचीही नजर असणार आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी