Mumbai : पालिका मुख्यालयातील उपाहारगृह सील; FDA ची कारवाई, १५ दिवसांसाठी परवाना रद्द  
मुंबई

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपाहारगृह सील; FDA ची कारवाई, १५ दिवसांसाठी परवाना रद्द 

ताकात माशी, कांदा भजीत प्लास्टिकचा धागा अशा तक्रारींमुळे सध्या गाजत असलेले मुंबई महापालिका मुख्यालयातील उपाहारगृह सील करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : ताकात माशी, कांदा भजीत प्लास्टिकचा धागा अशा तक्रारींमुळे सध्या गाजत असलेले मुंबई महापालिका मुख्यालयातील उपाहारगृह सील करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली असून १५ दिवसांसाठी कमल उपाहारगृहाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडला आहे. दरम्यान, महापालिकेतील कामगार अधिकारी याबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत दिले.

मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील एनएक्स इमारतीच्या तळमजल्यावरील उपाहारगृहात कर्मचारी व अधिकारी व अभ्यागत मोठ्या प्रमाणावर येत असतात. याचे कंत्राट कमल कॅटरर्स यांना देण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी कर्मचारी जेवण करत असताना ताकाच्या ग्लासात माशी सापडली होती. तर ३ जुलै रोजी कांदा भजीत प्लास्टिकचा धागा सापडला होता. याबाबत तक्रार करूनही कंत्राटदाराने फारशी दखल घेतली नाही.

अखेर याबाबतच्या बातम्या आल्यानंतर हे एफडीएने येथे दोन दिवसापूर्वी धाड टाकली.यात खाद्यपदार्थाचा दर्जा योग्य नसल्याचे दिसून आले. त्यामुळे गुरुवारी सकाळी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी त्याला सील ठोकले.

येथील निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थबाबत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी कामगार अधिकाऱ्याकडे चौकशी केली. परंतु कामगार अधिकाऱ्यांना याबाबत काहीच माहीत नव्हते. यावेळी शिंदे यांनी माहिती घेऊन आपल्याला कळवावे, असे सांगितले तरीही कोणतीच माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे स्थायी समितीत गुरुवारी शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी सदस्यांनी थेट कामगार अधिकाऱ्याला निलंबित करा, अशी मागणी लावून धरली. अखेर प्रभाकर शिंदे यांनी कामगार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश दिले.

३१ त्रुटी आढळल्या! 

कमल उपहागृह आस्थापनाची प्रारंभिक तपासणी ८ जून २०२६ रोजी करण्यात आली होती. तपासणीदरम्यान सर्वसाधारण स्वच्छता, आरोग्यविषयक बाबी व अन्न सुरक्षा नियमांचे अनेक उल्लंघन आढळून आल्याने ९ जून २०२६ रोजी सुधारणा सूचनांची नोटीस बजावण्यात आली होती. ही सूचना १६ जून रोजी संबंधित आस्थापनास प्राप्त झाली. तथापि, आस्थापनाकडून कोणताही लेखी खुलासा अथवा अनुपालन अहवाल सादर करण्यात आला नाही. त्यानंतर २२ जुलै रोजी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून पुनर्तपासणी करण्यात आली. पुनर्तपासणीमध्ये सुधारणा सूचनेतील ३१ पैकी सर्व त्रुटी कायम असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये स्वयंपाकगृहातील माशींचा प्रादुर्भाव, अन्न हाताळणी परिसराची अपुरी स्वच्छता, उपकरणे व परिसराची अपुरी देखभाल, तापमान नियंत्रण प्रणालीतील त्रुटी, आवश्यक स्वच्छता नोंदींचा अभाव, वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्रे विहित नमुन्यात नसणे, कर्मचाऱ्यांकडे FoSTaC प्रशिक्षण प्रमाणपत्रांचा अभाव, अंतर्गत/बाह्य अन्न सुरक्षा लेखापरीक्षणाच्या नोंदी नसणे तसेच आवश्यक अभिलेखांचे जतन न करणे अशा गंभीर त्रुटींचा समावेश आहे.

कर्मचारी, अभ्यागताची उपासमार 

बाहेरील हॉटेलपेक्षा स्वस्त दरात खाद्यपदार्थ मिळत असल्यामुळे या उपाहारगृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी असे. आझाद मैदानात बंदोबस्ताला उपस्थित असलेले पोलीसही येथे येऊन नाश्ता व जेवण करीत. पालिका सभागृह चालू असताना नगरसेवकही येथे येत. आता हे उपाहारगृह बंद झाल्यामुळे सर्वांच्याच खाण्याची पंचाईत झाली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

CJP Protest : आज देशव्यापी आंदोलन; शांततापूर्ण सहभागाचे कॉकरोच पार्टीचे आवाहन

विरोधक, सत्ताधाऱ्यांची निदर्शने; संसदेबाहेर जोरदार घोषणायुद्ध

Mumbai : ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची विद्यार्थ्यांना धमकी; पोलीस दलातील चालकावर कारवाई

NEET पेपरफुटीप्रकरणी फास्ट ट्रॅक न्यायालय; पंतप्रधान मोदींची घोषणा

मुंबईत रविवारी निषेध मोर्चा; उद्धव आणि राज ठाकरे यांची घोषणा, केवळ तिरंगा घेऊन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन