मुंबई : दोन क्षण विश्रांतीचे, तणावमुक्त जीवन अन् पर्यावरणाचे संवर्धन यासाठी झाडांची लागवड करणे काळाची गरज आहे. कांजूर येथील डॅफोडिल हिलिंग इमारतीच्या टेरेसवर २५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर गार्डन साकारण्यात आले आहे. यात पेरू, चिकू अशी विविध झाडांची लागवड केली असून वाचनालय सुरू करण्यात आले आहे. तरुण पिढीला वाचनाची गोडी निर्माण व्हावी, तणावमुक्त जीवनासाठी एकांतात बसून विश्रांती घेता यावी, यासाठी टेरेस गार्डन संकल्पना राबवण्यात आली असून विजेच्या बचतीसाठी सोलार पॅनल लावण्यात आले आहे. डॅफोडिल हिलिंग इमारतीच्या टेरेसवरील गार्डन परिसरातील लोकांच्या पसंतीस उतरले आहे.
अंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असलेल्या मुंबईत शहरातील हवा गेल्या काही वर्षांपासून खालावत चालली आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत असून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हिरवळ निर्माण करणे काळाची गरज आहे. मुंबईत १०८४ उद्याने असून उद्यान विभागातर्फे या सर्व उद्यानांचा कायापालट करण्यात येत आहे. त्यानुसार आता उद्यान विभाग टेरेसवर ग्रीनगार्डन आणि लायब्ररी संकल्पना राबवण्यात येत आहे. कांजूरमार्ग येथील डॅफोडिल हीलिंग इमारतीच्या टेरेसवर हा प्रयोग करण्यात आला. इमारतीच्या अडीच हजार चौरस मीटरच्या भूखंडावर हे गार्डन विकसित करण्यात आले आहे. त्याला ‘एकांत’ असे नाव देण्यात आले आहे. डॅफोडिल हिलिंग इमारत परिसरात २२ मजली आणखी ७ टॉवर असून त्या टॉवरच्या टेरेसवर ग्रीन गार्डन संकल्पना राबवावी, असे आवाहन टॉवरमधील रहिवाशांना करणार असल्याचे संदीप दरपेल यांनी सांगितले. टेरेस गार्डन आणि वाचनालयाची संकल्पना तसेच डिझाइन संदीप दरपेल यांची आहे. या संकल्पनेचा मुंबईतील हा पहिलाच प्रयोग आहे. टेरेसवर भलेमोठे गार्डन तयार करण्यात आले आहे. ताज्या हवेत श्वास, हिरव्यागार टेरेस गार्डनमधून फिरणे, चैतन्यमय वातावरण फुलांनी आणि निसर्गाच्या प्रसन्न सुगंधाने सजलेल्या ठिकाणी गप्पा, त्यासह सर्व वयोगटांसाठी आकर्षक उपक्रम राबवण्यात येत आहे.
फळे फुलांची लागवड
थंड, उष्ण वातावरणात वाढतील अशी फळे, फुलझाडे लावण्यात आली आहेत. थंड वातावरणातील ऑर्चिड, जास्वंद, गुलाब, बोगनव्हिला, झायपुरा गोल्डन प्रकारातील फुलझाडे लावण्यात आली आहेत. टेरेस गार्डनवर बोन्साय प्रकारातील झाडे लावण्यात आली आहेत. फळे आणि फुलांनी भरून गेल्याने हे गार्डन सर्वांचे मन मोहून घेत आहे.
वाचन संस्कृतीला प्रोत्साहन!
ग्रीन गार्डन आणि लायब्ररी फ्युजन ही संकल्पना राबवण्याचा विचार बऱ्याच दिवसांपासून केला होता. या संकल्पनेमुळे ग्रीनरी वाढणार असून वाचन संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न आहे. भविष्यात असे प्रयोग वाढताना दिसतील.
जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक, महापालिका