मुंबई

अखेर मृत्यूशी झुंज संपली ;वीणा संतूर इमारत आग दुर्घटनेतील तिसरा मृत्यू

कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला

विक्रांत नलावडे

मुंबई : बोरिवली पश्चिम साई बाबा नगर, मंतनपाडा येथील तळ अधिक आठ मजली वीणा संतूर इमारतीत २३ ऑक्टोबर रोजी आग लागली होती. या दुर्घटनेत १०० टक्के भाजलेल्या राजेश्वरी भारत (२४) यांनी पाच दिवस मृत्यूशी दिलेली झुंज अखेर संपली. कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या दुर्घटनेत होरपळून दोन जणांचा मृत्यू त्यादिवशी झाला होता, तर राजेश्वरी भारत यांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे.

बोरिवली पश्चिम येथील साईबाबा नगर, मंतनपाडा येथे तळ अधिक आठ मजली विणा संतूर या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील एका घरात सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास आगीची घटना घडली. अचानक लागलेल्या या आगीच्या घटनेनंतर काही रहिवाशांनी जीव वाचवण्यासाठी इमारती बाहेर, तर काही रहिवाशांनी वरील मजल्यावर धाव घेतली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागलेली ही आग काही क्षणात पसरल्याने येथील काही रहिवासी अडकून पडले. आग डोंब आणि धुराचे लोट यामुळे काही रहिवासी इमारतीत अडकले. या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना जवळील शताब्दी व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी ग्लोरी वालफाटी ( ४३), जोसू जेम्स रॉबर्ट (८) या दोघांचा मृत्यू झाला, तर १०० टक्के भाजलेल्या राजेश्वरी भारत यांचा शुक्रवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एकाची प्रकृती चिंताजनक!

या दुर्घटनेत जखमी झालेल्या पाचपैकी तिघांचा मृत्यू झाला असून, एका जखमीने स्वतःहून डिस्चार्ज घेतला, तर लक्ष्मी बूरा (४० वर्ष) ५० टक्के भाजल्या असून, कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यांची प्रकृती स्थिर असली तरी चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था

मराठा आंदोलकांनी केला चक्काजाम; जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा

इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाचे नमते! फिरत्या शौचालयासह पुरवल्या इतर सुविधा; आंदोलकांसाठी पाण्याचे टँकर्सही अखेर उपलब्ध