कुटुंब वाढले! राणी बागेत चार 'बाळ पेंग्विन'; दोन नर, दोन मादी हंबोल्ट पेंग्विन पिल्लांचा जन्म; संख्या २१ वरून २५ वर 
मुंबई

कुटुंब वाढले! राणी बागेत चार 'बाळ पेंग्विन'; दोन नर, दोन मादी हंबोल्ट पेंग्विन पिल्लांचा जन्म; संख्या २१ वरून २५ वर

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथील हंबोल्ट पेग्विन कुटुंबात आणखी चार चिमुकल्या पिल्लांची भर पडली आहे. दोन नर आणि दोन मादी अशा चार पिल्लांचा जन्म झाल्याने राणी बागेतील पेंग्विनची संख्या २१ वरून २५ झाली आहे.

Swapnil S

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथील हंबोल्ट पेग्विन कुटुंबात आणखी चार चिमुकल्या पिल्लांची भर पडली आहे. दोन नर आणि दोन मादी अशा चार पिल्लांचा जन्म झाल्याने राणी बागेतील पेंग्विनची संख्या २१ वरून २५ झाली आहे. वाढत्या संख्येमुळे महापालिकेने पेंग्विन कक्षाच्या विस्ताराच्या कामालाही गती दिली आहे

दरम्यान, या दोन नर पिल्लांचे पिकाचू आणि लिओ असे नामकरण करण्यात आले आहे, तर मादी पिल्लांचे डेजी आणि बेला असे नामकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

राणी बागेत २०१७ मध्ये प्रथम आठ हंबोल्ट पेंग्विन दाखल झाल्यानंतर ते मुंबईकरांसाठी आणि विशेषतः लहान मुलांसाठी मोठे आकर्षण ठरले आहेत. सुरुवातीला पेंग्विन आणण्याच्या निर्णयावरून मोठा वाद झाला होता. मात्र कालांतराने त्यांचे यशस्वी संगोपन आणि प्रजनन झाल्याने आता त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.

ऑलिव्ह आणि पोपॉय या जोडीने एका मादी पिल्लाला जन्म दिला. तर डोनाल्ड आणि डेजी या जोडीने दोन नर आणि एका मादी पिल्लाला जन्म दिला. त्यामुळे सध्या राणी बागेत १२ नर आणि १३ मादी असे एकूण २५ हंबोल्ट पेंग्विन आहेत. पेंग्विनची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेने विद्यमान पेंग्विन कक्षालगत सुमारे ५०० चौरस मीटर क्षेत्रात नवीन कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्तारामुळे पेंग्विनसाठी अधिक अनुकूल अधिवास उपलब्ध होणार असून पर्यटकांनाही त्यांचे अधिक चांगल्या प्रकारे दर्शन घेता येणार आहे.

‘त्यांनी’ पेंग्विन आणले, आम्ही सिंह आणू...

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पुन्हा सिंह आणण्याच्या प्रयत्नांना वेग आला असून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला टोला लगावला. ‘त्यांनी पेंग्विन आणले, आम्ही सिंह आणू’, असे वक्तव्य करत आदित्य ठाकरेंना महापौरांनी डिवचले आहे. दरम्यान, सिंह आणण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. प्राणिसंग्रहालयातील सिंहांचा पिंजरा गेली चार वर्षे रिकामा असून, तो पूर्णपणे तयार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव पुन्हा मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यक मंजुरी मिळविण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून गरज पडल्यास गुजरातमधील साकरबाग प्राणिसंग्रहालयाला स्वतः भेट देण्याचीही आपली तयारी असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

अशी आहे राणी बाग

  • राणी बागेचे एकूण क्षेत्रफळ - २ लाख १० हजार ४३७ चौरस मीटर

  • प्राण्यांच्या निवासासाठी क्षेत्र - ३७ हजार ९०० चौरस मीटर

  • प्राण्यांची संख्या : सुमारे ३५०

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मतदार म्हणून वगळले तरी नागरिकत्व कायम - सर्वोच्च न्यायालय

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना हटवण्याच्या विधेयकावरील संसदीय समितीचा अहवाल लांबणीवर

मतदार तपासणी मोहिमेला मुदतवाढ

Nanded : दोन मुलांसह शिक्षकाची आत्महत्या; कार थेट गोदावरी नदीत, व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये वरिष्ठांवर गंभीर आरोप

पाऊस परतलाय, समुद्रात वादळाचा इशारा; अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, कोकणात मुसळधार