मुंबई : औषध विक्रीच्या आमिषाने विदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अंधेरीतील एका कॉल सेंटरमध्ये छापा टाकून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी १० आरोपींना अटक केली. साकिब मुस्ताक सय्यद, यश राजेश शर्मा, उजेर उस्मान गनी शेख, गौतम दिपक महाडिक, जुनैद शमीम शेख, जीवन लोकेश गौडा, मुनीब जुनैद शेख, हुसैन हैदरअली शेख, विजय दशरथ कोरी, मोहम्मद सुफियान नदीम अहमद मुकादम अशी त्यांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टात हजर केले असता, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अंधेरीतील वेस्टर्न एक्स्प्रेस मेट्रो रेल्वेजवळील द समिट बिझनेस बेच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची विविध औषधांचे आमिष दाखवून फसवणूक केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
या माहितीनंतर पोलीस पथकाने तिथे छापा टाकला होता. यावेळी तिथे चौदाजण विविध संगणकावर हेडफोन माइकवरून अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधून त्यांना ते अमेरिकन नागरिक असल्याचे भासवून व्हायग्रा, सिआलीस, लिवेट्रो आदी औषधांची विक्री करत होते. अशा प्रकारे या टोळीने बोगस कॉल सेंटर सुरू करून महाराष्ट्रासह केंद्र सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडविल्याचे उघडकीस आले.