मुंबई : पॅन-आधार कार्ड लिंक करण्याचा बहाणा करून एका ६० वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध ना. म जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला तिच्या पतीसोबत लोअर परेल परिसरात राहते. दहा दिवांपूर्वी तिला एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज करुन त्यांचे बँक खाते पॅन-आधार कार्डने लिंक केले आहे का? याबाबत विचारणा केली होती; मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर तिला तीन दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो बँकेचा मॅनेजर असल्याचे सांगून पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करा. नाहीतर त्यांना बँकेचे व्यवहार करता येणार नाही असे सांगितले. त्यानंतर त्याने तिला एक लिंक पाठवून त्यात तिची माहिती भरण्यास प्रवृत्त केले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने तिचा मेल, मोबाईल तसेच बँकेची माहिती दिली होती. ही माहिती अपलोड केल्यानंतर काही वेळात तिच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार होऊन सुमारे दिड लाख रुपये डेबीट झाले होते. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच तिने तिच्या पतीला ही माहिती सांगून ना. म जोशी मार्ग पोलिसांत तक्रार केली.