Mumbai : गोवंडीतील शाळेविरोधात गुन्हा दाखल; पालिकेच्या नोटीसनंतरही शाळा सुरूच संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : गोवंडीतील शाळेविरोधात गुन्हा दाखल; पालिकेच्या नोटीसनंतरही शाळा सुरूच

गोवंडी पूर्व येथील बैगणवाडी भागात अनधिकृतपणे शाळा चालवल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तहजीब इस्लामिक इंग्लिश स्कूलचे प्राचार्य, सचिव आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिनिधी

मेघा कुचिक/मुंबई

गोवंडी पूर्व येथील बैगणवाडी भागात अनधिकृतपणे शाळा चालवल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तहजीब इस्लामिक इंग्लिश स्कूलचे प्राचार्य, सचिव आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ११ जूनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

एफआयआरमधील माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) मुंबई महानगरपालिकेला बेकायदेशीर शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश देणारे पत्र पाठवले होते. या निर्देशानंतर पालिकेच्या शिक्षण विभागाने मुंबईभरातील शाळांचे सर्वेक्षण केले असता, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ दरम्यान १६४ प्राथमिक शाळा बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे आढळून आले होते.

यानंतर शिक्षण विभागाने या सर्व शाळांच्या प्राचार्य, सचिव आणि मालकांना नोटिसा बजावून संस्था त्वरित बंद करण्याचे आदेश दिले होते.

दोनदा नोटीस देऊनही शाळा प्रशासन ढिम्म

तहजीब इस्लामिक इंग्लिश स्कूल ही शाळा पालिकेच्या एम-पूर्व विभागांतर्गत येते. एफआयआरनुसार, मुंबई महानगरपालिकेने या शाळेला दोन वेळा नोटिसा बजावून उत्तर सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. मात्र, शाळेने या नोटिसांना कोणतेही उत्तर दिले नाही आणि आपले कामकाजही बंद केले नाही. गोवंडी पूर्व येथील एका चार मजली (ग्राउंड अधिक तीन मजले) इमारतीतून ही शाळा अनधिकृतपणे सुरूच ठेवण्यात आली होती. पालिकेने वारंवार नोटिसा देऊनही शाळा व्यवस्थापनाने ती बंद न केल्यामुळे अखेर मुंबई महानगरपालिकेने पोलिसांत धाव घेत अधिकृत तक्रार दाखल केली.

कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल

मुंबई महानगरपालिकेच्या खासगी प्राथमिक शाळा विभागाचे उपशिक्षणाधिकारी निसार अहमद अब्दुल सत्तार खान यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यातील कलम १८ (नियम व मानकांचे पालन करणे) आणि कलम २२३ (लोकसेवकाद्वारे जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

IAF AN-32 Aircraft Crash : लँडिंगदरम्यान अनर्थ! जोरहाटमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले, VIDEO समोर

विद्यार्थ्यांना मिळणार ST चे डिजिटल ‘रुपे’ कार्ड; सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड योजना, विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रियेला गती

ठाण्यात अनधिकृत ३७ शाळांविरोधात गुन्हे दाखल; ५८ शाळांची यादी जाहीर, दिवा परिसरात सर्वाधिक शाळा

राज्यातील ११६ दुय्यम कारागृहांना कायमचे टाळे; महसूल विभागाचा निर्णय

IIT मुंबईचे १६ ‘डीप-टेक’ स्टार्टअप्स झळकणार जागतिक मंचावर; फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स २०२६ मध्ये होणार सहभाग