मुंबई

मुंबईत १ लाख झाडे लावण्याचा संकल्पच महापौर रितू तावडे यांच्याकडून हरित मुंबई अभियानाला गती

मुंबई महानगरात येत्या काही दिवसांत किमान १ लाख झाडांची लागवड करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी पडीक मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा, दुभाजक, वाहतूक बेटे तसेच उड्डाणपुलांखालील जागांचा वापर करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगरात येत्या काही दिवसांत किमान १ लाख झाडांची लागवड करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी पडीक मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा, दुभाजक, वाहतूक बेटे तसेच उड्डाणपुलांखालील जागांचा वापर करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

हरितक्षेत्र वाढवून प्रदूषण आणि धूळ नियंत्रणास मदत होईल, अशा उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिली. महापौरांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या उपस्थितीत बुधवारी महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत या अभियानाचा आढावा घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त, उद्यान, रस्ते व पूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महापौर तावडे यांनी सांगितले की, “मुंबईतील हरित संपदा वाढविणे हे प्राधान्य असून जागतिक पर्यावरण दिनापासून सुरू झालेल्या वृक्षारोपण अभियानाला अधिक गती देण्यात येणार आहे. रस्त्यांच्या कडेला, दुभाजकांवर, वाहतूक बेटांवर आणि उड्डाणपुलांखाली झाडे लावण्यासाठी योग्य जागांचा शोध घेण्यात येणार आहे. तसेच विलेपार्ले येथील उड्डाणपुलाखाली साकारलेल्या शहरी शेतीच्या धर्तीवर अभिनव संकल्पना राबविण्याचाही विचार करण्यात येईल.”

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मुंबईतील नवीन रस्ते, पूल आणि विविध प्रकल्पांमुळे उपलब्ध होणाऱ्या जागांचा हरित विकासासाठी उपयोग करण्याचे निर्देश दिले. मुंबईत एक लाख झाडे लावण्याइतकी जागा उपलब्ध होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सर्व विभागांना लवकरात लवकर आराखडे सादर करण्यास सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवडीसारख्या पर्यायांचाही विचार करण्याचे त्यांनी सुचविले.

महापालिकेच्या या महत्त्वाकांक्षी हरित अभियानामुळे मुंबईतील हिरवळ वाढण्यास, प्रदूषण नियंत्रणास आणि शहराच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

Mumbai : रेल्वे स्थानकावरील एस्केलेटर दोन मिनिटांत सुरू होणार; पश्चिम रेल्वेच्या नवीन व्यवस्थेमुळे खंडित वेळ होणार कमी

७०२ कोटींचा प्रस्ताव मंजूर; सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते वरळी प्रॉमेनेड जोडणाऱ्या पादचारी पुलाचा मार्ग मोकळा

Navi Mumbai : उरणला साथीच्या आजारांचा विळखा; रुग्णालयांत रुग्णांची गर्दी

ST सहकारी बँकेत ३४ कोटींचा गैरव्यवहार? खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी