मुंबई

Mumbai : जी.टी.बी.नगर पुनर्विकास मार्गी; त्रिपक्षीय विकास करार पूर्ण - खासगी जमिनीवरील म्हाडाचा पहिला प्रकल्प

शीव कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या गुरू तेग बहादुर नगर (जी.टी.बी. नगर) समूह पुनर्विकास प्रकल्पास महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे.

Swapnil S

मुंबई : शीव कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या गुरू तेग बहादुर नगर (जी.टी.बी. नगर) समूह पुनर्विकास प्रकल्पास महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे. प्रकल्पातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांनी म्हाडा व नियुक्त कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी (सी अँड डी) यांच्यासोबत आज त्रिपक्षीय विकास करार केला तसेच म्हाडा व सी अँड डी यांच्यामध्ये देखील बांधकाम-विकास करार संपन्न झाला. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत म्हाडात हा करार झाला. यावेळी म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर तसेच किस्टोन रिअलटर्स (रुस्तुमजी ग्रुप) चे व्यवस्थापकीय संचालक बोमन इराणी उपस्थित होते.

जी.टी.बी. नगर समूह पुनर्विकास प्रकल्प हा म्हाडाकरिता सामाजिक बांधिलकी जोपासणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरतो. सुमारे ११.२० एकर जागेवर पसरलेल्या या ऐतिहासिक वसाहतीतील २५ इमारतींमध्ये सुमारे १२०० सदनिका होत्या. सन २०२० मध्ये या इमारती बृहन्मुंबई महानगरपालिकेने धोकादायक घोषित केल्याने त्या पाडण्यात आल्या व रहिवाशांना अन्यत्र स्थलांतरित व्हावे लागले. खासगी जमिनीवरील हा प्रकल्प म्हाडामार्फत राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला.

काय मिळणार?

  • खासगी जमिनीवरील इमारतींचा (सी अँड डी) एजन्सीमार्फत राबविण्यात येणारा हा म्हाडाचा पहिलाच पुनर्विकास प्रकल्प आहे. शासन मान्यतेनंतर करार प्रक्रिया पूर्ण झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस आता गती मिळणार आहे.

  • या पुनर्विकासाअंतर्गत १२०० लाभार्थ्यांकरिता तीन आधुनिक व आकर्षक निवासी टॉवर्स उभारण्यात येणार असून त्यामध्ये ३९ ते ४८ मजल्यांच्या इमारती उभारण्याचे नियोजन आहे. विकास नियंत्रण नियमावली ३३(९) अन्वये फंजिबलसह किमान ४.५ चटई क्षेत्रफळ उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पातील लाभर्थ्यांना ६३५ चौरस फुटांची आधुनिक सोयोसुविधांयुक्त सदनिका विनामूल्य मिळणार असून प्रत्येक सदनिका धारकाला स्वतंत्र गेटेड कम्युनिटी संकल्पनेनुसार या प्रकल्पात पारंपरिक रॅम्पद्वारे प्रवेशयोग्य बहुमजली बेसमेंट व पोडियम स्तरांवर वाहनतळाची सोय करण्यात आली आहे.

  • सीसी प्राप्त झाल्यानंतर सर्व पात्र रहिवासी लाभार्थ्यांना दरमहा रुपये २०,००० इतके भाडे अनुदान अदा करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी इमारतींची देखभाल व व्यवस्थापनाची जबाबदारी म्हाडातर्फे पार पाडण्यात येणार आहे.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली