मुंबई : गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराशी सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. भविष्यात अशाप्रकारचे रुग्ण आढळल्यास खबरदारी म्हणून मुंबई शहरातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रमुख रुग्णालयात लहान मुले व प्रौढांकरिता व्हेंटिलेटरसह ५० आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णसंख्येत वाढ झाल्यास सेव्हन हिल्स रुग्णालयात व्हेंटिलेटरसह १०० आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई येथे जीबीएस रुग्णाकरिता देण्यात येणारी सर्व औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.
पुणे जिल्ह्यात सध्या गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांची नोंद झालेली आहे. सद्यस्थितीत मुंबईमध्ये जीबीएस नवीन रुग्ण आढळून आलेला नाही व कुठली ही वाढ झालेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईतील सर्व शासकीय व खासगी आरोग्य संस्थांना कोणत्याही नवीन जीबीएस रुग्णांची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याच्या साथरोग कक्षाला कळवण्याचे निर्देश दिले आहेत. सदर आजाराचे रुग्ण मुंबई शहरामध्ये वर्षभरात सर्वसाधारणपणे तुरळक प्रमाणात आढळून येतात, असेही सांगण्यात येते.
जीबीएसच्या उपचारासाठी मुंबईतील सर्व महानगरपालिका रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये सुसज्ज असून रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधोपचार, साधनसामग्री आणि तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध आहे, अशी माहिती देण्यात आली. नागरिकांनी घाबरून न जाता उपरोक्त कुठलेही लक्षणे आढळल्यास मार्गदर्शन व उपचाराकरिता जवळच्या मनपा रुग्णालयास त्वरित संपर्क करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केले आहे.
काय आहे गुइलेन-बॅरे सिंड्रोम?
गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ ऑटोइम्यून विकार आहे. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच चेतासंस्थांवर हल्ला करते. यामुळे स्नायू कमजोर होतात आणि गंभीर रुग्णामध्ये पक्षाघातही होऊ शकतो. हा आजार एखाद्या श्वसन किंवा पचनसंस्थेच्या संसर्गानंतर होतो आणि त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे.
जीबीएस हा संसर्गजन्य रोग नसून तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही. याचे निश्चित कारण अज्ञात आहे. मात्र बहुतेकवेळा श्वसन किंवा पोटाच्या (पचनसंस्थेच्या) संसर्गानंतर तो होतो.
आजाराची लक्षणे काय?
- अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी/ लकवा
- अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी
- डायरिया (अधिक दिवसांकरिता)
काय काळजी घ्याल?
- पिण्याचे पाणी उकळून प्यावे.
- स्वच्छ व ताजे अन्न खावे.
- वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
- शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित न ठेवल्यासही संसर्ग टाळता येईल.
- हात किंवा पायांमध्ये अचानक वाढत जाणारा अशक्तपणा असल्यास त्वरित जवळच्या मनपा रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना दाखवावे.
जीबीएस रुग्णांसाठी विशेष उपचार-व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : गिलियन-बार सिंड्रोम (जीबीएस) रुग्णांसाठी विशेष उपचार व्यवस्था करण्याचे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जीबीएस रोगावर उपाययोजना करण्याच्या तयारीचा आढावा घेतला. पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटल आणि पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय जीबीएस रुग्णांसाठी समर्पित रुग्णालये म्हणून नियुक्त केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. जीबीएस रुग्णांवरील उपचार महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट असतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.