“माझ्यावर गेल्या वर्षी शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती. त्या काळात मात्र काहींच्या हालचाली जोरात सुरू होत्या. आघाडी सरकार पाडण्यासाठी आणि पक्षविरोधातच या हालचाली होत्या,” असा गौप्यस्फोट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. “समजा मी त्यांना त्यावेळी मुख्यमंत्री केलं जरी असतं, तर त्यांनी आणखी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला असता. कारण त्यांची भूक भागत नाही. त्यांना मुख्यमंत्रिपदही पाहिजे होते आणि आता त्यांना शिवसेनाप्रमुख व्हायचे आहे. शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वतःची तुलना करायला लागलात? ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे,” अशा शब्दांत ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले आहे. या मुलाखतीवर विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. विधानसभेतील आमदारांच्या फुटीपाठोपाठ शिवसेनेच्या लोकसभेतील खासदारांमध्ये फूट पडली. शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हावर दावा सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ला मुलाखत दिली. कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. आपले सरकार पाडण्याचे प्रयत्न हे गेल्या वर्षीपासून सुरू होते, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
“शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदारांना कुठल्या ना कुठल्या तरी पक्षात विसर्जित किंवा सामील व्हावे लागेल. मग त्यांच्या समोर पर्याय काय आहे? एकतर भाजपमध्ये जावे लागेल, नाहीतर दुसरे छोटे पक्ष आहेत. हे जर कोणत्या पक्षात गेले तर भाजपला यांचा जो उपयोग करून घ्यायचा आहे तो उपयोग संपेल. कारण, त्यांना त्यांची ओळख तीच करून द्यावी लागेल, म्हणूनच ते आम्ही म्हणजेच शिवसेना, असा भ्रम निर्माण करत आहेत,” असेही ठाकरे म्हणाले.
सडलेली पाने झडताहेत
ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडाचे वर्णन ‘पानगळ’ या एकाच शब्दात केले आहे. “सडलेली पानं झडताहेत. ज्यांना झाडाकडून सगळे काही मिळालं, सगळा रस मिळाला म्हणून त्यांचा टवटवीतपणा होता. ती पाने सगळे झाडाकडून घेऊनही ती गळून पडताहेत. आता झाड कसं उघडंबोडकं झालंय असं दाखवायचा प्रयत्न ते करत आहेत,” अशी टीका ठाकरे यांनी केली आहे; परंतु, “पानगळीनंतर झाडाला पुन्हा कोंब फुटतात आणि झाड पुन्हा हिरवगार होते, असे सांगत ठाकरे यांनी शिवसेनेला पुनर्वैभव प्राप्त होईल,” असा विश्वास व्यक्त केला आहे.“ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला, त्यांनीच विश्वासघात केलाय. तेच आता आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून आवई उठवत आहेत. त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की, २०१४ साली भाजपने युती तोडली, तेव्हा आपण आपण काय सोडलं होते? काहीच सोडले नव्हते. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही,” असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे.
उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
“उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर कितीही टीका केली असली, तरी आज आम्ही काही बोलणार नाही. कारण उद्धव ठाकरे यांचा उद्या वाढदिवस आहे,” असे सांगत माजी मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
बाळासाहेबांना किती लहान करणार - नितेश राणे
“उद्धव ठाकरे म्हणतात की, बाळासाहेबांचा फोटो लावू नका. महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांना दैवत मानते. उद्या त्यांचे वंशज जर असे म्हणाले की, आमच्या पूर्वजांचे फोटो लावू नका, मग काय होईल? बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील असंख्य जनतेचे दैवत आहेत. उद्धव ठाकरे यांना हे कळत नाही की, बाळासाहेब ही त्यांची मक्तेदारी नाही. तसे असेल तर मग शिवाजी पार्कला जे स्मारक आहे, जिथे सगळे नतमस्तक होतात, तिथेही तुम्ही टाळे लावणार काय?” असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.