मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या तडाक्यापासून दिलासा मिळाला होता. परंतु, आता पुन्हा उन्हाचा पारा चढणार असून एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य प्रकारे काळजी घ्यावी, असे आवाहन कुलाबा वेधशाळेकडून करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मंगळवारी (२३ एप्रिल) कुलाबा केंद्रामध्ये ३२.१ अंश सेल्सिअस, सांताक्रूझ केंद्रात ३४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच २६ ते २८ एप्रिलदरम्यान मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत घराबाहेर पडून नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यात
दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट पडण्याची शक्याता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज देखील वर्तवला आहे. बुलढाण्यात मंगळवारी अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेत पिकांचे मोठे नुकासान झाले असून काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. या अवकाळी पावसामुळे नागरिक आणि बळीराजा हवालदिल झाला आहे.