छाया : दीपक कुरकुंडे
मुंबई

चला, चला दिवाळी आली; खरेदीची वेळ झाली! मुंबईतील बाजारपेठांमध्ये ‘शॉपिंग’साठी तोबा गर्दी

‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या उक्तीनुसार रविवारी मुंबईतील दादरसह, ठाणे, कल्याण व डोंबिवलतील महत्त्वांच्या बाजारपेठांमध्ये ‘शॉपिंग’साठी तुडुंब गर्दी उसळली होती.

Swapnil S

मुंबई : दिवाळी हा दिव्यांचा सण. हा फक्त उत्सव किंवा कौटुंबिक सोहळा नसून या सणात खरेदीलाही भारतात तितकेच महत्त्व आहे. दिवाळीमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या उक्तीनुसार रविवारी मुंबईतील दादरसह, ठाणे, कल्याण व डोंबिवलतील महत्त्वांच्या बाजारपेठांमध्ये ‘शॉपिंग’साठी तुडुंब गर्दी उसळली होती.

दिवाळी हा सण तेजाचा, उत्साहाचा, खमंग फराळाचा आणि मुख्य म्हणजे खरेदीचा. इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, सुकामेवा अशा कितीतरी वस्तूंची मोठी खरेदी या सणाच्या निमित्ताने होत असते. त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. आता दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सध्या दिवाळीसह लग्नसराई सुरू झाल्याने शेवटचा रविवार हा खरेदीच्या उत्साहाचा आणि गर्दीचा ठरला. दादरमधील हिंदमाता, प्रभादेवी, चर्नीरोड, भुलेश्वर, माटुंगा कंदील गल्ली येथील सर्व बाजारपेठा आणि अनेक मोठी दुकाने मुंबईकरांच्या गर्दीने गजबजली होती. दिवाळीच्या काही दिवसआधी ‘ऑनलाइन शॉपिंग फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आले होते.

ऑनलाईन खरेदी झाल्यानंतर आता ग्राहकांनी थेट बाजारपेठांमध्ये जाऊन आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. फराळासह अनेक वेगवेगळ्या वस्तू, फटाके, कुर्ता, कंदील, ड्रायफ्रूट्स आणि काजूपासून तयार केलेल्या वेगवेगळ्या मिठाई खरेदीसाठी ठिकठिकाणी गर्दी होत आहे.

घराच्या सजावटीचे साहित्य, नवीन कपडे, लक्ष्मीपूजेचे साहित्य, दिवाळी फराळ, गृहोपयोगी वस्तू, विद्युत रोषणाईचे साहित्य, फटाके खरेदीसाठी मुंबईकरांनी दादर, लालबाग, क्रॉफर्ड मार्केटमध्ये रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. इतकेच नव्हे तर मुंबईकरांपाठोपाठ अन्य जिल्ह्यातील नागरिकांनीही खरेदीसाठी मुंबई गाठली होती. शनिवार आणि रविवार या दोन सुट्ट्यांच्या दिवशी लोकांनी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडून खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला.

दादरमध्ये मुंगीला शिरायलाही जागा नाही

मुंबईसह महामुंबईतील अनेक नागरिकांना दादरमध्ये दिवाळीची खरेदी केली नाही तर खरेदी पूर्ण झाली, असे वाटत नाही. त्यामुळे दूरदूरवरून लोक खरेदीसाठी दादरमध्ये धाव घेत असतात. दादर बाजारपेठ म्हणजे एकाच ठिकाणी सर्वप्रकारच्या वस्तू मिळण्याचे हमखास ठिकाण. तेथे वस्तूंच्या, कपड्यांच्या, फॅशनच्या वेगवेगळ्या व्हरायटी पाहण्यास मिळतात. त्यामुळे दादरमध्ये खरेदी करण्यास बहुतांश मुंबईकर प्राधान्य देतात. यामुळेच दिवाळीच्या तोंडावर आलेल्या रविवारी दादरमध्ये मुंबईकरांनी एवढी गर्दी केली की मुंगीलाही शिरायला जागा नव्हती.

कंदील खरेदीसाठीही तुफान गर्दी

दिवाळीत कंदील खरेदी करणे हा एक वेगळाच अनुभव असतो. बाजारात असलेल्या आकर्षक विविध कंदीलांमधून आपल्या आवडीचा कंदील निवडणे हे एक दिव्यच असते. बाजारात स्वदेशी तसेच चिनी बनावटीचे विविध कंदील दाखल झाले असून त्यांना पारंपरिक कंदीलांचे आव्हान आहे. सध्या कापडी कंदील आणि पैठणी साड्यांपासून बनवलेले कंदील हे विशेष आकर्षण ठरत आहे. बांबूने बनवलेले नक्षीदार कंदीलही बाजारात उपलब्ध आहेत.

महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; राज्यात भाजपच 'नंबर वन' : महाविकास आघाडीची अर्धशतकापर्यंतच मजल

लाडक्या बहिणींवर अपात्रतेची तलवार; ई केवायसी न केल्यास योजनेतून होणार आऊट; केवळ १ कोटी ६० लाख महिलांनी केली केवायसी

सर्वसामान्यांना झटका; रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ, २६ डिसेंबरपासून नवे दर लागू

'दिगंतारा' करणार अंतराळातील क्षेपणास्त्रांचे ट्रॅकिंग; उपग्रहांच्या मदतीने ठेवणार नजर

बांगलादेशात हिंदूंची परिस्थिती चिंताजनक! मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता