प्राध्यापकावर कारवाई; IIT मुंबईतील विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी संस्थेने मागितली माफी; गेल्या २० वर्षांत १६० विद्यार्थ्यांची आत्महत्या 
मुंबई

प्राध्यापकावर कारवाई; IIT मुंबईतील विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी संस्थेने मागितली माफी; गेल्या २० वर्षांत १६० विद्यार्थ्यांची आत्महत्या

IIT Bombay Student Death : ‘आयआयटी’ मुंबईने बीटेक विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूप्रकरणी प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांना डीन पदावरून दूर केले आहे. तसेच, साहिलच्या मृत्यूबाबत यापूर्वी केलेल्या वक्तव्यांबाबत संस्थेने माफीही मागितली आहे.

Swapnil S

मुंबई : ‘आयआयटी’ मुंबईने बीटेक विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूप्रकरणी प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांना डीन पदावरून दूर केले आहे. तसेच, साहिलच्या मृत्यूबाबत यापूर्वी केलेल्या वक्तव्यांबाबत संस्थेने माफीही मागितली आहे. आयआयटी मुंबईने म्हटले आहे की, साहिल याच्या मृत्यूपूर्वी नेमके काय घडले होते, याची चौकशी पूर्ण होण्यापूर्वी काहीही सांगणे योग्य नव्हते. २२ वर्षीय साहिल हा विद्यार्थी आयआयटी मुंबईच्या एनर्जी सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. १८ सप्टेंबरच्या रात्री पवई कॅम्पसमधील वसतिगृहाच्या खोलीत तो मृतावस्थेत आढळला होता.

आयआयटी मुंबईने १९ सप्टेंबर रोजी आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले होते की, घटनेच्या दिवशी साहिल याला मिड-सेमिस्टर परीक्षेदरम्यान मोबाईल फोन वापरताना पकडण्यात आले होते. संस्थेने दावा केला होता की, साहिल यांनी चॅटजीटीपीवर प्रश्नपत्रिका अपलोड करण्याचा प्रयत्न केला. पकडल्यानंतर वसतिगृहात जाऊन त्याने आत्महत्या केली.

विद्यार्थ्यांच्या १८ मागण्यांमध्ये अनेक अटी…

  • या दस्तावेजात मागण्यांबाबत दर आठवड्याला अपडेट देण्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी म्हटले आहे की, ठरलेल्या मागण्या एका महिन्याच्या आत पूर्ण न झाल्यास संचालक, डीन एपी आणि डीन एसए यांनी राजीनामा द्यावा.

  • विद्यार्थ्यांनी आयआयटी बॉम्बेकडून सार्वजनिक माफी मागितली आहे. संस्थेच्या एका जुन्या लिंक्डइन पोस्टमध्ये साहिलबाबत अपूर्ण आणि अस्पष्ट माहिती देऊन त्याची प्रतिमा खराब करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.

  • याशिवाय संचालक, डीन एसए, डीन एपी आणि साहिलच्या विभागप्रमुखांसोबत खुली बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली. या बैठकीत घटनेशी संबंधित प्रश्न थेट विचारण्याची संधी द्यावी, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

  • याशिवाय यावर्षी आयआयटी बॉम्बेमध्ये जीव गमावलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली.

प्राध्यापकांनी शिवीगाळ केल्याचा आरोप

साहिलच्या आई-वडिलांनी, प्राध्यापक दुल्ला यांच्यासह इतर लोकांविरोधात १९ सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल केला होता. साहिलचे वडील रविंद्र वाकोडे यांनी सांगितले की, प्राध्यापक दुल्ला हे त्यांच्या मुलाला जातिवाचक शिवीगाळ करत होते आणि सुमारे ३ महिन्यांपासून त्याचा मानसिक छळ केला जात होता.

पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आणि SC/ST कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे. त्यामुळे गुन्हे शाखेतर्फे संबंधित प्राध्यापक आणि इतरांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

प्रा. दुल्लांच्या समर्थनार्थ शिक्षक मैदानात

आयआयटी मुंबईचा विध्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण लागले आहे. साहिलच्या कुटुंबीयांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांच्यावर कुटुंबाने आरोप केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. तर दुसरीकडे प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांच्या समर्थनार्थ आयआयटी मुंबईचे प्राध्यापक मैदानात उतरले आहेत. जवळपास ७५० शिक्षकांनी त्यांच्या समर्थनार्थ निर्दर्शने केली आहेत.

तक्रार निवारण यंत्रणेतील त्रुटींची कबुली

आयआयटी मुंबईतील तक्रार निवारण यंत्रणेत त्रुटी असल्याचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी मान्य केले आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण जलद आणि सुलभ व्हावे यासाठी नवीन सपोर्ट पोर्टल सुरू करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षाचा बीटेक विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येनंतर संस्थेत तीन दिवस आंदोलन सुरू होते. या पार्श्वभूमीवर आयोजित सुमारे चार तासांच्या मुक्त बैठकीत संचालकांनी ही माहिती दिली.

२०२५ मध्ये सर्वाधिक १६ विद्यार्थ्यांची आत्महत्या

यावर्षी आयआयटी मुंबईमधील आत्महत्येची ही तिसरी आणि देशातील नववी घटना आहे. गेल्या ६ वर्षांच्या कालावधीत २०२५ मध्ये सर्वाधिक १६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. ग्लोबल आयआयटी माजी विद्यार्थी सपोर्ट ग्रुपनुसार, गेल्या २० वर्षांत आयआयटीच्या एकूण १६० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दुष्काळाचा ३ टप्प्यांत आढावा; राज्य सरकारकडून मदत; उपाययोजनांना सुरुवात, ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार

हेक्टरी १ लाख मदत, पूर्ण कर्जमाफी द्या : हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेसच्या 'ताठ कण्या'चा असाही इतिहास...

आजचे राशिभविष्य, २२ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी