IIT मुंबईच्या प्लेसमेंटमधील वेतनामध्ये वाढ; नोकरीच्या संधीमध्ये किंचित घट, वेतनामध्ये तब्बल १० टक्क्यांनी वाढ (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

IIT मुंबईच्या प्लेसमेंटमधील वेतनामध्ये वाढ; नोकरीच्या संधीमध्ये किंचित घट, वेतनामध्ये तब्बल १० टक्क्यांनी वाढ

आयआयटी मुंबईच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील प्लेसमेंटमध्ये गतवर्षीच्या तुलनेत नोकरीच्या संधीमध्ये किंचित घट झाली आहे.

Swapnil S

मुंबई : आयआयटी मुंबईच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील प्लेसमेंटमध्ये गतवर्षीच्या तुलनेत नोकरीच्या संधीमध्ये किंचित घट झाली आहे. मात्र प्लेसमेंटमधील विद्यार्थ्यांच्या वेतनामध्ये तब्बल १० टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ७० टक्के इतकी राहिली आहे.

आयआयटी मुंबईचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार जुलै २०२४ ते जून २०२५ दरम्यान राबविण्यात आलेल्या प्लेसमेंटमध्ये २ हजार ४६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ हजार ४० विद्यार्थांनी प्लेसमेंटमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. यातील १ हजार ४२२ विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या. यामध्ये ६५ आंतरराष्ट्रीय नोकऱ्यांचा समावेश होता. तसेच २६० विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटपूर्व नोकरीच्या संधी स्वीकारल्या. डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यात १ हजार २७२ विद्यार्थ्यांना, तर दुसऱ्या टप्प्यात १५० विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, सल्लागार, वित्त, संशोधन आणि विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उत्पादन व्यवस्थापन क्षेत्रांतील ४१७ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी ३६८ कंपन्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नोकऱ्या दिल्या. मागील वर्षाच्या तुलनेत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा २ टक्क्यांनी वाढ झाली, मात्र काही कंपन्यांनी नोकरीच्या कमी संधी उपलब्ध केल्यामुळे नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ३.५ टक्क्यांनी घट झाली.

गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा कंपन्यांनी कमी नोकऱ्या दिल्या असल्या तरी वेतनामध्ये १० टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सरासरी वार्षिक वेतन २६.४५ लाख रुपये इतके मिळाले आहे. मध्यम श्रेणीतील वेतन हे २० लाख इतके आहे.

प्लेसमेंटमध्ये २० लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक वेतन मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे २० टक्क्यांनी वाढली आहे. तसेच २० लाखांपेक्षा जास्त वेतन देणाऱ्या कंपन्यांची संख्या गतवर्षीच्या १२३ वरून या वर्षी १५० पर्यंत वाढली आहे.

अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे वर्चस्व

अभियांत्रिकी क्षेत्रातील ९६ कंपन्यांनी ४२९ नोकऱ्या दिल्या, तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील १२४ कंपन्यांनी ३९३ विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या. त्यापैकी ९९ कंपन्यांनी ३२० विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर क्षेत्रातील नोकऱ्या दिल्या आहेत.

पीएचडीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला

पीएचडी विद्यार्थ्यांचा यंदा प्लेसमेंटमध्ये सहभाग वाढला, मात्र नोकऱ्यांच्या संख्येत घट झाल्याने गतवर्षीपेक्षा कमी विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या. २०२४-२५ मध्ये नोंदणी केलेल्या २४७ विद्यार्थ्यांपैकी २८ विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या. गतवर्षी ३२ विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या होत्या. मात्र सरासरी वेतन १८.४६ लाखांवरून १९.६४ लाखांपर्यंत वाढले. अनेक पीएच.डी. विद्यार्थी पोस्ट-डॉक्टोरल फेलोशिप, संशोधन, स्टार्टअप्स किंवा उच्च शिक्षणाच्या पर्याय निवडतात. त्यामुळे प्लेसमेंट प्रक्रियेत त्यांचा सहभाग तुलनेने कमी असतो.

आता नियम पारदर्शकता कायदा नागरिकांसाठी आवश्यक असल्याचे पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचे मत

Pune : रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमानाची यशस्वी निर्मिती; ‘प्रोजेक्ट गरुडा’ची इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

पुण्यात बनावट सोने तारण ठेवून बँकेची ४ कोटींची फसवणूक; १३ जणांवर गुन्हा दाखल

Thane : नियमांची पायमल्ली शिंदे सेनेकडूनच; उपमहापौर कृष्णा पाटील यांचा गंभीर आरोप

NEET Paper Leak : मोटेगावकर क्लासेसला टाळे; हजारो विद्यार्थी हवालदिल