मुंबई : अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील जेईई निकालात फेरफार करणे आयआयटीच्या एका विद्यार्थ्याच्या चांगलेच अंगलट आले. जेईई परीक्षेनंतर संकेतस्थळावर सँपल रिझल्ट जारी झाला तेव्हा त्यात आपल्याला ९९ टक्के गुण होते. मात्र काही वेळाने निकाल डाऊनलोड केला तेव्हा त्यात ८३ टक्केच गुण नमूद होते, असा दावा करणाऱ्या विद्यार्थ्याचा उच्च न्यायालयाने चांगलाच समाचार घेतला.
न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या खंडपीठाने विद्यार्थ्याला २०२५-२६ आणि २०२६-२७ या दोन वर्षांसाठी परीक्षेतून बाद करण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मात्र विद्यार्थ्याच्या भविष्याचा विचार करता एनटीएनने योग्य तो निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले.
आयआयटीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने जानेवारी २०२५ मध्ये जेईईची परीक्षा दिली. फेब्रुवारीत या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. सुरुवातीला संकेतस्थळावरील रिझल्टमध्ये त्याला ९९ टक्के गुण पडल्याचे सर्वांना कळवले. मात्र काही वेळाने रिझल्ट डाऊनलोड केला तेव्हा त्यावेळी त्यात विद्यार्थ्याला ८३ टक्केच गुण नमूद होते. आधीच्या सँपल रिझल्ट प्रमाणे आपल्याला नवा सुधारीत रिझल्ट जारी करण्याचे आदेश न्यायालयाने एनटीएला द्यावेत, अशी विनंती करत या विद्यार्थ्याने हायकोर्टात याचिका दाखल केली होती.