मुंबई

मतदारराजाचे मन वळवण्यासाठी इच्छुक व माजी उमेदवारांनी मतदारराजांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात

प्रतिनिधी

२२७ वरून २३६ प्रभाग रचनेवर राज्य निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुका कधीही जाहीर होतील, याची उत्सुकता नेते मंडळींमध्ये वाढली आहे. मतदारराजाचे मन वळवण्यासाठी इच्छुक व माजी उमेदवारांनी मतदारराजांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने प्रभागाच्या अंतिम फेररचनेवर शुक्रवारी शिक्कामोर्तब केल्याने मुंबईत नवे नऊ प्रभाग वाढल्याचे निश्चित झाले आहे. प्रभागांची संख्या आता २२७ वरून २३६ झाली आहे. त्यामुळे पालिका निवडणूक कधी याच्या प्रतीक्षेत असलेले राजकीय पक्ष, तसेच इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. सीमांकनात प्रभागांची मोडतोड झालेली असल्याने आपला मतदार दुसऱ्या प्रभागात फेकला गेला नसेल ना, याची धाकधूक माजी नगरसेवक, इच्छुकांमध्ये वाढली आहे. त्यामुळे नव्या प्रभाग रचनेची चाचपणी करण्यावर त्यांनी भर दिला आहे. नवीन नऊ प्रभागांचा कोणाला फायदा व तोटा होणार याचा आढावा घेण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षही कामाला लागले आहेत. काही पक्षांनी याची खास मानसे नेमून त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. नव्या प्रभाग रचनेचा अभ्यास करून मतदारांचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी नऊ प्रभाग वाढल्याने या नवीन प्रभागांचा फायदा तोटा कोणाला होणार याचाही अंदाज घेणे सुरू झाले आहे. आयोगाने प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब केल्याने निवडणुकीच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे. दरम्यान, निवडणूक कधी असेल याबाबत येत्या १७ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींनी वेग येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

मुंबई महापालिकेत मागील अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता होती. यात काही वर्षे भाजप शिवसेनेसोबत सत्तेत एकत्र होते. यावेळी मात्र पालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप कट्टर विरोधक असणार आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही पक्ष कामाला लागले आहेत. भाजपने पालिकेतील भ्रष्टाचारावर रान उठवण्यास सुरुवात केली आहे, तर शिवसेनेने विकासकामांचा धडाका सुरू ठेवला आहे. विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शिवसेना कामाला लागली असून अनेक ठिकाणी भूमिपूजने, उद्घाटने सुरू केली आहेत. शिवसेनेसोबत राज्याच्या सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाची रणनीती मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या १७ मे नंतर निवडणूक कधी हे स्पष्ट झाल्यावर पालिका निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरुवात होणार असल्याचे चित्र आहे.

आजचे राशिभविष्य, २५ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी