केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किंमतीत ४० टक्के वाढ केल्यानंतर सीएनजीच्या दरात मुंबई व परिसरात प्रति किलो ६ रुपये तर पीएनजीच्या दरात ४ रुपयांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ सोमवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. या दरवाढीमुळे ऐन सणासुदीला सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे.
एक किलो सीएनजीसाठी आता ८६ रुपये तर पीएनजीसाठी ५२.५० (एससीएम) मोजावे लागतील, असे महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सांगितले.
सरकारने नैसर्गिक वायूच्या दरात वाढ केल्याने कंपनीच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. तसेच सरकारने ‘एमजीएल’च्या वाट्याचा १० टक्के गॅस पुरवठा कमी केला आहे. त्यामुळे कंपनीला चढ्या दराने बाजारातून गॅस विकत घ्यावा लागत आहे. तसेच डॉलर्सच्या तुलनेत रुपया घसरल्याने गॅस खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागत आहेत, असे कंपनीने सांगितले.
गेल्या आठवड्यात सरकारने नैसर्गिक वायूची किंमत ८.५७ डॉलर्स एमबीटीयू निश्चित केली होती. तर दुर्गम भागातील गॅस उत्खननासाठी १२.४६ डॉलर्स दर जाहीर केला. या गॅसचे रुपांतर सीएनजी व पीएनजीत केले जाते. या गॅसवर वाहने धावतात व अन्न शिजते.
मालवाहतूकही महागण्याची शक्यता
ताज्या दरवाढीमुळे मालवाहतूकही महागणार आहे. त्याचा फटका शेवटी सर्वसामान्यांनाच बसणार आहे. पेट्रोल - डिझेलनंतर गेल्या काही काळात गॅसची चढत्या क्रमाने वाटचाल सुरू आहे. यामुळे सामान्य माणसांचे जिणे कठीण होऊन बसले आहे.